Breaking News

श्री गणेश मित्रमंडळाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने; बैठकीत निर्णय

पनवेल ः प्रतिनिधी

कामोठ्यातील श्री गणेश मित्रमंडळाचा गणेशोत्सव सेक्टर 34चा राजा म्हणून ओळखला जातो. संपूर्ण जगभर सध्या कोरोनाच्या साथीमुळे महामारीची परिस्थिती उद्भवली आहे. या परिस्थितीत देशभर लॉकडाऊन सुरू असताना गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी विचारविनिमय करण्यासाठी श्री गणेश मित्रमंडळाची बैठक झाली. या बैठकीत साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे तसेच इतर काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने ध्वनिवर्धक यंत्रणा न लावता साजरा करायचा, लोकवर्गणी गोळा करायची नाही, ज्या भाविकांची इच्छा असेल त्यांनी मंडळाच्या बँक खात्यावर ऑनलाइन वर्गणी ट्रान्सफर करावी. दरवर्षीप्रमाणे अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव न करता पाच दिवसच गणेशाची आराधना करायची असे ठरले. शासनाच्या सर्व निर्बंधाचे पालन करून गणेशोत्सव साजरा करायचा. शासनाने गणेश मूर्तीची मर्यादा चार फुटांपर्यंत दिली असली तरी अडीच फुटांच्या श्रींच्या मूर्तीची स्थापना करायची असे ठरले. श्रींच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आला. शक्य झाल्यास गणेशोत्सवात आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचेदेखील ठरवण्यात आले. गणेश आरतीचे प्रसारण ऑनलाइन सुविधेद्वारे करण्याचे ठरले. सर्व निर्णय एकमताने घेण्यात आलेल्या या बैठकीस मंडळाचे अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष अमित पानसंडे, सचिव रवी कदम, खजिनदार शेखर जगताप, सहखजिनदार लक्ष्मण चिखले, सहसचिव दशरथ शिंदे, सदस्य सुधीर काठमोरे, चंद्रशेखर काळे, दिलीप जाधव, विशाल पाटील, मंडळाचे हितचिंतक राजेश धनावडे, मोहन पोटे, सचिन तांबोळी, शाहू भोसले आदी उपस्थित होते.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणार्‍या श्री गणेश मित्रमंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक कार्यातदेखील हे मंडळ अग्रेसर असते. परिमंडळ 2च्या पोलीस आयुक्तालयाचा विघ्नहर्ता पुरस्कार मिळालेल्या या मंडळामार्फत यापूर्वी वृक्षारोपण, आरोग्य शिबिर, आधार केंद्र, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप, शिवजयंती, साई भंडारा यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. लॉकडाऊन कालावधीतही सेक्टर 34मधील रहिवाशांच्या अडचणी सोडविण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते कार्यरत होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply