नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता कायम आहे. सी-व्होटर या सर्वेक्षण संस्थेने पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर विविध राज्यांतील किती
टक्के जनता समाधानी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला असून, इंडिया टुडेने याबाबत वृत्त दिले आहे.
राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा पराभव केला असला, तरी या राज्यांमध्ये मोदींची लोकप्रियता टिकून आहे. राजस्थानमध्ये 68.3 टक्के लोकांनी, छत्तीसगडमध्ये 64.4 टक्के लोकांनी आणि मध्य प्रदेशात 63.5 टक्के लोकांनी मोदींच्या कामावर समाधान व्यक्त केले.
पंतप्रधान मोदी झारखंडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असून, तिथे 74 टक्के जनता त्यांच्या कामावर समाधानी आहे. झारखंडमध्ये चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलपासून मतदान सुरू होईल. 2014मध्ये भाजपने झारखंडमध्ये लोकसभेच्या 14 पैकी 12 जागा जिंकल्या होत्या.