Breaking News

बाजारपेठा भाविकांनी फुलल्या; गणेशभक्तांचा उत्साह कायम

पनवेल : रामप्रहर वृत्त

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील सर्वांच्या आवडत्या गणपती बाप्पाचे आगमन शनिवारी (दि. 22) घरोघरी तसेच सार्वजनिक स्वरुपात होणार आहे. यामुळे बाप्पाच्या सेवेसाठी लागणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पनवेलच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली होती. काही नागरिक नियमांचे पालन करीत तर काही नागरिक नियमांचे उल्लघंन करीत असल्याचे ही दिसत होते.

कोरोनाचे सावट असून सुध्दा गणेशोत्सवासाठी लागणार्‍या वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. बरेच महिने हातावर पोट असणार्‍या छोट्या व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते. यामध्ये फुल मार्केट, सजावटीचे साहित्य, धार्मिक विधी साठी लागणारे साहित्य, भाजी यांची मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदी करीत होते.

दरम्यान, काही प्रमाणात खरेदीसाठी येणार्‍या भाविकांच्या वाहने, व्यापार्‍यांच्या साहित्याचे टेम्पो, दररोज ये-जा करणारी वाहने यांच्यामुळे वाहतुक कोंडी झाली होती. तसेच पावसामुळे तारांबळ उडालेली पहावयास मिळाली. गाड्या हळुहळू पुढे सरकत होत्या.

एकंदरीत कोरोना संसर्ग वाढत असला तरी भाविकांचा उत्साह तसु भर देखील कमी झालेला नसल्याचे चित्र बाजारपेठेतील गर्दी दर्शवित होती. परंतु, दरवर्षीप्रमाणे होणारी गर्दी यावर्षी त्या प्रमाणात नसल्याचे चित्र असून दुसरीकडे लॉकडाऊनमुळे आर्थिक गणिते बिघडल्याने खरेदी करताना नागरिक काहीसा आखडता हात घेत आहेत. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर होणार्‍या आर्थिक उलाढालीवर यंदा परिणाम झाल्याचे व्यापार्‍यांचे म्हणणे आहे.

मिठाई, पूजेच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी

उरण : वार्ताहर

गणपती बाप्पांचे आगमन होणार असल्याने भक्तांची उरण बाजार पेठेत मिठाई व पूजेच्या सामानची खरेदी करण्यासाठी भक्तांनी कुपाच गर्दी केली होती. सुगंधी अगरबत्ती, धूप, स्वादिष्ट मिठाई आदी खरेदी करण्यासाठी, फुले, हार, दुर्वा आदी खरेदी करण्यासाठी भक्तांनी गर्दी केली होती. संपूर्ण उरण बाजारपेठ सजली होती.   बाजारपेठा सजल्या, पण चायनानिर्मित वस्तूंना गणेशभक्त नापसंती देत असून, प्लास्टिकच्या फुलांचे झुंबर, तसेच लेस पडदे बाजारात दाखल झाले आहेत. फुलांचे झुंबर, लेस पडदे ग्राहकांसाठी आकर्षण ठरत असून, सजावटीसाठी अतिशय चांगले दिसून येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी प्लास्टिकच्या फुलांचे झुंबर व लेस पडद्यांना अधिक पसंती दर्शविली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले  आहे. मिठाई खरेदी करण्याकडे भक्तांचा कल आहे. पेढे, मोदक, लाडु, स्पेशल वेगवेगळ्या स्वाद असलेल्या बर्फी, गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी व बाप्पाला आवडणारे मोदक प्रत्येक ग्राहक धेऊन जातातच. मोदक खरेदी  खरेदी करण्याकडे भक्तांना काळ जास्तच आहे, असे महाराष्ट्र स्वीटचे पुरुषोत्तम  सेवक यांनी सांगितले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply