Breaking News

महाड इमारत दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू

तब्बल 40 तासांनी बचावकार्य झाले पूर्ण

महाड ः प्रतिनिधी
सोमवारी महाडमधील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली आणि संपूर्ण शहर हादरून गेले. अनेक जण या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात होती. प्रशासनाकडून तातडीने बचावकार्याला सुरुवात करण्यात आली व तब्बल 40 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नऊ जणांचा जीव वाचविण्यात यश आले.
दुर्दैवाने 16 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. यामध्ये सात पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे.
काजळपुरा परिसरात 10 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली तारिक गार्डन इमारत 24 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास कोसळली.
त्वरित प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आल्यानंतर सात जणांना वाचविण्यात यश आले. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहचले आणि बचाव आणि शोधकार्याला वेग आला. शोधमोहीम सुरू असताना तब्बल 19 तासांच्या प्रयत्नांनंतर सहा वर्षांच्या मोहम्मद बांगी या मुलाला वाचविण्यात यश आले, तर 28 तासांनंतर 40 वर्षीय महिरुनिस्सा अब्दुल हमीद काझी या महिलेला ढिगार्‍याखालून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. 24 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात आलेले बचाव आणि शोधकार्य 26 ऑगस्ट रोजी संपविण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
एक आरोपी गजाआड    
महाड शहरातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेतील पाच दोषींपैकी रायगड पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ठाणे-कळवा येथून पहाटे पावणेपाच वाजता पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याला माणगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची 30 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे. आरसीसी सल्लागार बाहुबली धमाने असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
दुर्घटनेतील मृतांची नावे
सयद हमिद शेखनाग (45), आदिल हमीद शेखनाग (14), रोशनबी दाऊदखान देशमुख (56), नौसिन नदिम बांगी (30), मतिन मुकादम (45), फातिमा शौकत अलसुलकर (60), नवीद झमाने (30), इस्मत हसिम शेखनाग (38), फातिमा अन्सारी (43), शौकत आदम अलसुलकर (50), अल्तमश बल्लारी (35), आयशा नोसिन बांगी (7), रुकया नदीम बांगी (2), अब्दुल हमिद काझी (58), हबिबा दाऊद हजवाने (80), कमरुनिसा अन्सारी (63).
बेघरांसाठी तात्पुरता निवारा
दुर्घटनेत ज्या लोकांचे हक्काचे घर गेले त्यांना तात्पुरता निवारा म्हणून शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे स्थलांतरित करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी दिली. या इमारतीत 45 सदनिका होत्या, मात्र यातील 14 सदनिका बंद होत्या, तर काही सदनिका मालकांनी आपल्या सदनिका भाड्याने दिल्या होत्या.
धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर
महाड शहरात अनेक इमारती धोकादायक आहेत. पावसाळ्यापूर्वी महाड नगरपालिकेने जवळपास 40 इमारतींना धोकादायक ठरवून रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर होण्याचे आदेश दिले होते, मात्र आजही या इमारती आणि तेथील रहिवासी जैसे थेच आहेत. तारिक गार्डन दुर्घटनेनंतर पालिका प्रशासन सतर्क झाले असून शहरातील अल कासीम या धोकादायक इमारतीमधील रहिवाशांना इमारत खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply