लोणावळा : प्रतिनिधी
बातम्यांच्या रोजच्या धकाधकीत पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांना क्षणभर विश्रांतीसाठी मुंबई मराठी पत्रकार संघाने लोणावळा येथील दी.गो. तेंडुलकर स्मृतिमंदिरातील विश्रामधामाचे हाती घेतलेले नूतनीकरण वेळेत पूर्ण होईल, असा आशावाद व्यक्त करीत हे विश्रामधाम कौटुंबिक जिव्हाळा जपणारे केंद्र बनेल, अशा शुभेच्छा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पायाभरणी समारंभात दिल्या. 20 लाख रुपयांची देणगीही त्यांनी या वेळी जाहीर केली.
या विश्रामधाम नूतनीकरणासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आतापर्यंत एकूण 70 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे, तर कामगार नेते महेंद्र घरत यांनीही या उपक्रमासाठी पाच लाख रुपयांची देणगी या वेळी जाहीर केली.
कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, पन्नास वर्षापूर्वी विश्रामधाम उभारणीत सक्रीय सहभाग असलेले माजी अध्यक्ष कुमार कदम, कार्यवाह शैलेंद्र शिर्के, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, विश्वस्त राही भिडे, देवदास मटाले, अजय वैद्य, प्रकल्प निरीक्षक दीपक म्हात्रे, वास्तुविशारद मनोज गोलतकर, राजू माळी यांच्यासह कार्यकारिणी सदस्य तसेच अनेक पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार संघाचे लोणावळा येथील विश्रामधाम थ्री-स्टार करण्याचा शब्द विद्यमान कार्यकारिणीने दिला होता. विद्यमान विश्वस्त, आजी-माजी अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या सूचनांचा एकत्रित विचार करून अखेर थ्री-स्टार विश्रामधामाच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पहिले दमदार पाऊल मुंबई मराठी पत्रकार संघाने टाकले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते लोणावळा येथे या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली. येत्या मार्चपर्यंत हे अद्ययावत विश्रामधाम उभे राहील, असे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. पत्रकार संघाच्या या भिंतींनी गेली 50 वर्षे अनेक जिव्हाळ्याच्या आठवणी जतन करून ठेवल्या आहेत आणि म्हणूनच हा जिव्हाळा जपून या विश्रामधामाचे नूतनीकरण केले जाईल, असेही चव्हाण म्हणाले.
पत्रकारांच्या या विश्रामधामाच्या उभारणीत अनेकांचे श्रम आहेत. मीही अनेक सामाजिक संस्थात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करतो. माझ्यातर्फे मी पाच लाखाची देणगी तर पत्रकार संघाला देत आहेच, पण भविष्यातही पत्रकार संघासोबत कायम जोडला जाईन, असे कामगार नेते महेंद्र घरत यांनी म्हटले.
या वास्तूच्या उभारणीसाठी पत्रकार संघाच्या तत्कालीन कार्यकरिणी सदस्यांनी खूप हाल अपेष्टा सोसल्या. त्या सगळ्यांच्या वतीने मी आज हा सत्कार स्वीकारत असल्याची कृतज्ञ भावना माजी अध्यक्ष कुमार कदम यांनी व्यक्त केली.
पत्रकार संघात वैविध्यपूर्ण उपक्रम राबवत असतानाच विश्रामधाम नूतनीकरणाचे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे. सर्व कार्यकारिणी आणि विश्वस्तांचे आम्ही त्यासाठी आभारी आहोत, अशी भावना कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यवाह शैलेंद्र शिर्के यांनी व्यक्त केली. निवेदन उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर यांनी केले.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 64व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभागी झालेले कलावंत देवदास मटाले, स्वाती घोसाळकर, रश्मी महांबरे, प्रशांत चिडे, सिद्धेश शिगवण, सुरेश ठुकरूल आणि दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांचा विशेष सत्कार या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि कामगार नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आला.
Check Also
उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम
भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …
RamPrahar – The Panvel Daily Paper