कर्जत : बातमीदार – लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माथेरानमध्ये महावितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला आहे. मीटर बंद असूनही रिडींग दाखवून बिल देणे, बिल भरलेले असूनही मागील महिन्यांची शिल्लक बिलात अधिक येणे, तक्रारींचे निवारण न होणे, वीज बिल भरणा कर्मचारी उपस्थित नसणे यामुळे ग्राहक मेटाकुटीला आले आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनने महावितरण कार्यालयावर धडक देऊन अधिकार्यांना धारेवर धरले. कोरोनामुळे साडेपाच महिन्यांमध्ये हाताला काम नाही. त्यातच 3 जूनला निसर्ग चक्रीवादळामुळे झालेली हानी आणि आता महावितरणाचा भोंगळ कारभार यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहे. असे असताना माथेरानमध्ये 1600 वीजजोडणीधारक असून, मार्च ते जून या चार महिन्यांचे बिल देण्यात आले. त्यामध्ये काही नागरिकांच्या तक्रारी होत्या, पण त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणीही अधिकारी हजर नव्हता. त्यामुळे नागरिकांची खूप गैरसोय झाली. काही लोकांना तर निसर्ग चक्रीवादळात पडलेल्या घराचे बिल आले आहे. त्यामुळे लोकांमध्ये महावितरणच्या कारभारावर तीव्र संताप होता. त्यामुळे मनसेने महावितरण कार्यालयात जाऊन उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …