मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरान आणि अग्रमानांकित काजल कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले.
अंतिम फेरीत गुफरानने रंगतदार तीन गेम रंगलेल्या लढतीत बिनमानांकित ठाण्याच्या राजेश गोहिलचा 21-25, 25-14, 25-11 असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. महिला एकेरीमध्ये कुमारीने दुसर्या मानांकित माजी सार्क व राज्य विजेती आयेशा मोहम्मदचा रोमहर्षक दोन गेम रंगलेल्या लढतीत 25-13, 25-15 असा फडशा पाडत आपले वर्चस्व सिद्ध करून दुसर्या विजेतेपदावर नाव कोरले.
पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील पहिल्या गेममध्ये अप्रतिम शाटॅ्स व आक्रमक खेळ करीत ठाण्याच्या राजेश गोहिलने सातव्या बोर्डपर्यंत 22-21 अशी आघाडी घेत आठव्या बोर्डमध्ये 3 गुण मिळवून 25-11 असा जिंकला. दुसर्या गेममध्ये माजी जागतिक उपविजेता मोहम्मद गुफरानने शांत चित्ताने आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करीत पाचव्या बोर्डपर्यंत 20-14 अशी आघाडी घेत सातव्या बोर्डमध्ये 5 गुण मिळवून 25-14 असा दुसरा गेम जिंकून 1-1ने बरोबरी केली. निर्णायक तिसर्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या मोहम्मद गुफरानने 5व्या बोर्डपर्यंत 18-11 अशी आघाडी घेतली. नंतरच्या सहाव्या बोर्डमध्ये त्याच्या ब्रेकमध्ये कटशॉटसचे प्रात्यक्षिक घडवित 7 गुणांचा बोर्ड मिळवून 25-11 असा जिंकून आपल्या पहिल्या विजेतेपदावर नाव कोरले.
तिसर्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या संदीप दिवेने दोन गेम रंगलेल्या लढतीत मुंबईच्याच अमोल सावर्डेकरवर 25-10, 25-8 अशी मात केली. महिला एकेरीमध्ये तिसर्या क्रमांकाच्या सामन्यात मुंबईच्या मिताली पिंपळेने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्याच नीलम घोडकेची 25-22, 25-16 अशी कडवी झुंज मोडीत काढली.