Breaking News

अवैधरित्या टाकण्यात आलेला मेडिकल वेस्टेज उचलावा

  • संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करावी
  • नगरसेवक नितीन पाटील यांची मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
येथील कर्नाळा स्पोर्ट्सजवळील राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिजच्या फुटपाथवर अवैधरित्या टाकण्यात आलेला मेडिकल वेस्टेज उचलून त्याची योग्य ती विल्हेवाट लावावी तसेच या गंभीर प्रकरणाची शहानिशा करून संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नितीन पाटील यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे गुरुवारी (दि. 10) केली.
या संदर्भात नगरसेवक नितीन पाटील यांनी निवेदन दिले असून, ते उपायुक्त विठ्ठल डाके यांनी स्वीकारले. स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, नगरसेवक अमर पाटील सोबत होते.
नगरसेवक नितीन पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल महानगरपालिका हद्दीतील कर्नाळा स्पोर्ट्सच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग असून, या महामार्गावरील पुलावर दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. याचबरोबर आजुबाजूच्या परिसरातील नागरिक राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर दररोज मॉर्निंग वॉक व सायंकाळी जेवल्यानंतर शतपावली करण्यासाठी येत असतात, मात्र या ठिकाणी काही दिवसांपासून अवैधरित्या मेडिकल वेस्ट टाकले जात असून, त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे प्रमाण वाढत आहे आणि या कारणाने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे तसेच या रस्त्यालगत चालणार्‍या नागरिकांच्या आरोग्यास मोठा फटका बसू शकतो.
एकीकडे कोरोना आजारावर आपण शर्थीचे प्रयत्न करून या आजाराविरोधात लढा देत आहोत, परंतु दुसरीकडे असे अवैधरित्या काही दवाखान्यांचे मेडिकल वेस्ट रोडवर टाकले जात आहे, ही अतिशय गंभीर बाब आहे. याची चौकशी करून हे कृत्य करणार्‍यांवर कडक कारवाई झाली पाहिजे. त्याबरोबर अशा प्रकारे हॉस्पिटलचे मेडिकल वेस्ट व्यवस्थितरित्या विघटित न झाल्याने आजूबाजुच्या परिसरातील नागरिकांमध्ये हॉस्पिटल व पनवेल महापालिकेबद्दल असंतोष निर्माण होत आहे. फुटपाथवरील मेडिकल वेस्टेजपासून नागरिकांना त्रास होऊ नये याकरिता संबंधित विषयाची तातडीने दखल घेत पनवेल महापालिका आरोग्य विभागामार्फत तेथील पाहणी करावी व मेडिकल वेस्टेज उचलून असे जीव घेणे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी तातडीने दखल घ्यावी तसेच संबंधित हॉस्पिटलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply