आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्या परिवाराला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी संबंधितांना निवेदन सादर केले आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री तसेच आरोग्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 9 सप्टेंबर रोजी कर्जत माथेरानचे पत्रकार संतोष पवार यांना शासनाच्या रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात घेऊन जाताना ऑक्सिजन संपला व दुसरा ऑक्सिजन वेळेत न लावल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. केवळ सरकारी यंत्रणेच्या निष्काळजीपणाने एका चांगल्या पत्रकाराला आपला जीव गमवावा लागला. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यातच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर व अत्यावश्यक उपचारांअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच शासकीय वैद्यकीय अपुरी यंत्रणा अशीच राहिली तर भविष्यातही अनेक रुग्णांना उपचाराअभावी प्राण गमवावे लागणार आहेत. या सर्व परिस्थितीला स्थानिक लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. शासनामार्फत या संदर्भात तातडीने सेवा सुविधा उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे
’रायगड माझा’ व ‘महाराष्ट्र न्यूज 24’ या स्थानिक वृत्तवाहिनीचे संपादक ज्येष्ठ पत्रकार तथा माथेरानचे माजी नगरसेवक दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी व त्यांच्या परिवाराला जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य करावे, अशी आग्रही मागणी करून कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात अधोरेखित केले आहे.