Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
दिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि लोकांच्या मदतीला धावणारे संतोष पवार यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय वर्तुळातील व्यक्तींना तसेच सामान्य नागरिकांनाही धक्का बसला आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी संतोष पवार यांचे चिरंजीव मल्हार पवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मल्हार यांना धीर दिला, तसेच घडलेल्या घटनेची माहितीही घेतली. पत्रकार म्हणून संतोष पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांना सामाजिक कामात कायम सहकार्य केले. संतोष पवार यांचे सुपुत्र मल्हार पवार सध्या क्वारंटाइन असल्याने तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्याकडे ही आर्थिक मदत सुपूर्द करण्यात येईल.
दिवंगत संतोष पवार यांनी काही वर्षे दै. ‘राम प्रहर’चे प्रतिनिधी म्हणूनही काम केले होते. संतोष पवार हे मराठी पत्रकार परिषदेचे माजी सरचिटणीस होते. रायगड जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले. उत्तम पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता आणि राजकीय विश्लेषक म्हणून त्यांची ओळख होती. शासनाच्या अधिस्वीकृती समितीवर ते कार्यरत होते, तसेच माथेरान नगरपालिकेवर नगरसेवक म्हणूनही ते निवडून गेले होते. संतोष पवार यांनी कर्जत येथे ’रायगड माझा’ आणि ‘महाराष्ट्र न्यूज 24’ नावाचे स्थानिक चॅनेलही सुरू केले. या चॅनेलचा चांगल्या प्रकारे जमही बसू लागला होता, परंतु काळाने त्यांच्यावर अकस्मात घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply