Breaking News

ग्रा.पं. निवडणुकीनिमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी-शेकापमध्ये जुंपली

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील शिरसे आणि पाथरज या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका नुकत्याच झाल्या. या निवडणुकांचा निकाल हा त्या त्या भागात वर्चस्व राखून असलेल्या पक्षांनी कायम राखला आहे, मात्र या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि शेकाप या मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा वाजले आहे. त्यामुळे जुळवून घेण्याची मानसिकता निर्माण झालेल्या शेकाप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याचे परिणाम राष्ट्रवादीला भोगावे लागण्याची शक्यता आहे. संतोष भोईर यांचे 20 वर्षे वर्चस्व राहिलेल्या शिरसे या ग्रामपंचायतीमध्ये 15 वर्षांनी पहिल्यांदाच निवडणूक झाली. त्या वेळी राष्ट्रवादीच्या स्थानिक आघाडीने संतोष भोईर यांच्या पॅनल विरुद्ध जोरदार तयारी केल्याचा आभास निर्माण केला, मात्र आपल्या शिरसे ग्रामपंचायतीमधील 20 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत शासनाच्या सर्व योजना राबवून प्रसंगी स्वतःच्या व्यवसायातील नफ्याची रक्कम घालून विकासकामे केल्याने जनतेने पुन्हा संतोष भोईर यांना कौल दिला. निवडणुकीआधी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, या हेतूने राष्ट्रवादीला नऊ पैकी तीन जागा देण्याची तयारी संतोष भोईर यांनी दाखवली होती, मात्र राष्ट्रवादीने जास्त आत्मविश्वास दाखवत निवडणूक लढवली आणि मोठा पराभव करून घेतला. राष्ट्रवादीला अन्य प्रभागांतील उमेदवार उभे करावे लागले. त्याचे परिणाम राष्ट्रवादीच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार 300चा आकडाही गाठू शकल्या नाहीत. तेथे सर्व जागा मोठ्या मताधिक्याने शिवसेना पॅनलने जिंकल्या. पाथरज या चार गावे आणि 16 आदिवासी वाड्यांचा समावेश असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये अपेक्षेप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी-शिवसेना-भाजप-काँग्रेस-मनसे यांच्या सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवार थेट सरपंच झाल्या. तेथील 13 पैकी 10 जागा सर्व राजकीय पक्षांनी वाटून घेऊन बिनविरोध केल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांचे एकमत न झाल्याने दोन जागांसाठी निवडणूक झाली. तेथे शेकाप विरुद्ध राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार  विजयी झाले. त्याच वेळी थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची मते आघाडीच्या उमेदवार घोडविंदे यांना न मिळता अपक्ष उमेदवार रसाळ यांच्या पारड्यात पडली, असा आरोप शेकाप कार्यकर्ते करू लागले आहेत. त्याचा परिणाम पाथरज ग्रामपंचायतीमध्ये दिसून येणार नाही, तर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सूर जुळत असलेल्या शेकाप-राष्ट्रवादी यांच्या संबंधात परिणाम निर्माण करणारा आहे. राष्ट्रवादी आणि शेकापचे संबंध पुन्हा एकदा ताणले गेले आहेत, हे शेकापकडून सरपंच आपलाच आहे, हे दाखविण्याच्या प्रकारावरून स्पष्ट होत आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply