नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गतवर्षात घडलेल्या 215 प्राणांकित आणि गंभीर अपघातात एकूण 90 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 55 टक्के अपघात दुचाकींचे आहेत. तसेच 34 टक्के अपघात पादचार्यांचे झाले असून दुचाकी व पादचार्यांच्या अपघातातील मृत्यूंचे प्रमाण एकूण मृतांच्या संख्येच्या 89 टक्के इतके आहे. त्यामुळे शहरातील दुचाकींचे अपघात रोखण्यासाठी नवी मुंबई वाहतूक विभागाकडून दुचाकीस्वारांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात विशेष मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येत आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2021 मध्ये घडलेल्या 215 अपघातांपैकी 89 प्राणांकित अपघातात 90 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यातील 107 अपघात गंभीर स्वरूपाचे होते, ज्यात 125 जण जखमी झाले, तर 19 किरकोळ अपघातात 26 जण किरकोळ जखमी झाले आहेत. यातील 119 दुचाकींच्या अपघातात 44 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. तर 75 जण गंभीर तर 13 किरकोळ जखमी झाले आहेत.
शहरातील 74 अपघातात 36 पादचार्यांचा मृत्यू झाला असून 36 पादचारी गंभीर जखमी झाले आहेत; तर दोन पादचारी किरकोळ जखमी झाल्याचे आढळले. या अपघातांपैकी 55 टक्के अपघात हे दुचाकींचे झाले असून 34 टक्के अपघात पादचार्यांचे झाले आहेत. दुचाकी व पादचार्यांच्या अपघातातील मृत्यूंचे प्रमाण एकूण मृतांच्या 89 टक्के असल्याचे आढळले आहे.
दुचाकी आणि पादचार्यांच्या अपघातात व मृत्यूंच्या संख्येत वाढ होत असल्याने नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागाने अपघात रोखण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा, वेगमर्यादेचे उल्लंघन करू नये, जड अवजड वाहनांपासून सुरक्षित अंतरावरून दुचाकी चालवावी, लेनकटिंग सावकाश व इतर वाहने पाहून करावी, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, अशा सूचना दुचाकीस्वारांना करण्यात आल्या आहेत; तर पादचार्यांनी ज्या ठिकाणी रस्ता ओलांडण्याबाबतचा फलक असेल तेथूनच रस्ता ओलांडावा, पादचारी पुलाचा वापर करावा, सिग्नलच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंगचा वापर करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
दुचाकींचे वाढते अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई पोलिस वाहतूक विभागाकडून यंदा हेल्मेट परिधान न करणार्या एकूण 42,271 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही वाहतूक नियमांचे उल्लंघन करून बेजबाबदारपणे वाहन चालविणार्या विशेष मोहिमेद्वारे कारवाई करण्यात येणार आहे.
-पुरुषोत्तम कराड, उपायुक्त, नवी मुंबई वाहतूक पोलीस