दुर्गवीर प्रतिष्ठानतर्फे अभिवादन मोहीम; शिवकालीन युद्धकलेचे सादरीकरण




पाली : प्रतिनिधी
मराठ्यांच्या पराक्रमाचा इतिहास जागृत करण्यासाठी व दुर्लक्षित वीरांना अभिवादन करण्यासाठी येथील दुर्गवीर प्रतिष्ठानने नुकतीच कावळ्या बावळ्या खिंड मोहीम आयोजित केली होती. या वेळी शिवकालीन युद्धकला पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोहिमेत सहभागी झालेल्या मुलींनी लाठीकाठी व दांडपट्ट्याचे सादरीकरण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
3-4 वर्षांपूर्वी दुर्गवीरांच्या निदर्शनास आले की कावळ्या बावळ्या खिंडीच्या पायथ्याशी असलेल्या संदोशी गावात काही अज्ञात वीरांच्या विरगळी अस्ताव्यस्त अवस्थेत पडल्या आहेत. दुर्गवीरांनी स्थानिकांना सोबतीला घेऊन या विरगळी संवर्धनासाठी प्रयत्न सुरू केले. तात्पुरते छप्पर उभारून विरगळींची अजून झीज होणार नाही याची काळजी घेतली. या खिंडीत लढलेल्या ज्ञात अज्ञात वीरांच्या पराक्रमाची आठवण म्हणून गेली तीन वर्ष मानवंदना मोहीम ठेवण्यात येते. या वर्षी मुंबई, कोल्हापूर, पुणे येथील दुर्गवीर सदस्य आणि स्थानिक उपस्थित होते.
कावळ्या बावळ्या खिंड – कावळ्या घाट
घोडखिंड, उंबरखिंड, नेसरीचीखिंड अशा कितीतरी खिंडी पराक्रमाने पावन झाल्या आहेत. त्यापैकीच एक कावळा बावळा खिंड. पानशेतहून सह्याद्रीची कोकणा दिवाकडून सांदोशी मार्गे रायगडला जाणारी वाट कावळ्या बावळ्या खिंडीतून जाते. या घाटवाटेला कावळ्या घाट असेही म्हणतात. औरंगजेबाच्या हुकुमानुसार जुल्फिकार खानाने रायगडास वेढा घातला. ह्याच वेळी येसूबाई, राजाराम महाराज, ताराबाई, तसेच इतर दरबारी मंडळी रायगडावर अडकून पडले. जुल्फिकार खानास मदत करण्यासाठी शहाबुद्धीन खान हा सरदार पानशेतहून कावळ्या बावळ्याच्या खिंडीतून रायगडकडे निघाला. त्या मोगली सरदाराची खबर सांदोशी गावातले गोदाजी जगताप व जिवाजी सर्कले नाईक यांना लागली. त्यांनी आपल्या नऊ साथीदारांसह शहाबुद्धीन खानास कावळ्या बावळ्या खिंडीत गाठले आणि त्याचा पराभव केला. शहाबुद्धीन खान उरलेसुरलेले सैन्य घेऊन औरंगजेबाकडे पळला होता. त्यामुळे राजाराम महाराज सुरक्षित वाटेने सुटले होते.
विविध दुर्लक्षित ऐतिहासिक ठिकाणे आणि वास्तू आहेत. त्या संवर्धित करून जगासमोर आणण्याचे कार्य दुर्गवीर प्रतिष्ठान करीत आहे. आपण प्रतिष्ठानला सहकार्य करू शकता. आसपासच्या परिसरात ऐतिहासिक वास्तू व ठिकाणे असल्यास त्याची माहिती प्रतिष्ठानला द्यावी.
-संतोष हासुरकर, अध्यक्ष, दुर्गवीर प्रतिष्ठान