अनुदानासाठी शासनाकडे प्रस्ताव
नवी मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनावरील उपाययोजनांसाठी नवी मुंबई महापालिकेने सात महिन्यांत 45 कोटी रुपये खर्च केले आहेत. कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता हा खर्च अजून वाढणार असून पालिकेने शासनाकडे 294 कोटींच्या अनुदानाचा प्रस्ताव पाठविला आहे.
कोरोनाच्या लढ्यात पालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च केला असून प्रस्तावित खर्चाच्या अनुदानापोटीचा एकूण 294 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याची माहिती पालिकेच्या वित्त विभागाने दिली आहे. शहरात मार्चपासून सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 38 हजारांपर्यंत नागरिक बाधित झाले आहेत. त्यासाठी मोठा खर्च करावा लागला असून नवी मुंबई महापालिकेने अल्पावधीत एमएमआर क्षेत्रातील सर्वांत मोठी व अद्ययावत कोरोना चाचणी प्रयोगशाळा त्याचप्रमाणे 20 दिवसांत सिडको प्रदर्शनी केंद्र येथे 1200 खाटांचे रुग्णालय उभारले. तसेच शहरात विविध ठिकाणी प्राणवायू खाटा, अतिदक्षता खाटा तसेच विविध प्रकारच्या आरोग्यसुविधा पुरवल्या आहेत. नव्याने कोरोना कालावधीसाठी कर्मचार्यांची भरती प्रक्रिया राबवली आहे. सातत्याने वाढणार्या या खर्चामुळे पालिकेवर आर्थिक बोजा वाढत आहे.