आगरी-कोळी बांधवांसाठी ठरणार उपयुक्त
कळंबोली : बातमीदार
उच्चशिक्षित झाल्यानंतर परदेशात गलेलठ्ठ पगाराच्या नोकरीच्या सुवर्णसंधी पायाशी लोटांगण घालत असताना निव्वळ
आई-वडिलांनी दिलेला मातृभूमीच्या सेवेचा मूलमंत्र जपण्यासाठी कळंबोलीतील अमोल ज्ञानेश्वर म्हात्रे हा युवक अमेरिकेमधील हाय प्रोफाइल नोकरीवर पाणी सोडून भारतात परतला आहे. आगरी व कोळी बांधवांना त्यांनी उत्पादित केलेल्या मच्छीची विक्री सहज, सोप्या पद्धतीने करता यावी यासाठी अमोल व त्याच्या तीन सहकार्यांनी एक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे. या अॅपच्या माध्यमातून मच्छी थेट कंपन्यांना तसेच ग्राहकांना विकता येणार आहे.
अमोल म्हात्रे हा कळंबोलीतील ज्ञानेश्वर म्हात्रे व गीता म्हात्रे यांचा सुपुत्र. उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्याने काही काळ अमेरिकेमधील एका हायटेक कंपनीत नोकरी केली, पण आई-वडिलांनी दिलेला देशप्रेमाचा मूलमंत्र जपण्यासाठी तो स्वदेशी परतला आहे. समाजासाठी काहीतरी करायचेय या भावनेने अमोलसह अक्षय घरत, आशिष पाटील व अक्षय जाधव यांनी मिळून एक अॅप बनवला आहे.
आगरी-कोळी समाजाचे युथ आयकॉन ‘नासा’चे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली अमोल म्हात्रे व त्याच्या टीमने बोंबील स्मार्ट कोळीवाडा हे ऑनलाइन स्मार्ट अप मोबदला न घेता आगरी व कोळी बांधवांसाठी नव्याने डिझाइन आणि विकसित केले आहे.
नव्या रूपातील, नव्या रंगातील आणि नवनवीन यूजर फ्रेंडली फीचर्ससह बोंबील स्मार्ट कोळीवाडा प्रकल्पातील बोंबील अॅप ग्राहकांच्या सेवेत नव्याने आणि जोमाने लवकरच सक्रिय होणार आहे.