रहिवाशांनी मानले चेअरमन, आमदारांचे आभार
उरण : वार्ताहर
जेएनपीटी बंदराच्या वसाहतीमधील भाडेवाढीला व्यवस्थापनाने 31 मार्च 2021पर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्याने रहिवाशांच्या शिष्टमंडळाने जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी, व्हाइस चेअरमन उन्मेश वाघ तसेच उरणचे आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.
जेएनपीटी बंदर प्रशासनाने आपल्या वसाहतीमध्ये भाडेवाढ करण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला होता. आधीच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर होरपळून निघालेल्या तेथील रहिवाशांनी अचानक झालेली ही भाडेवाढ रद्द करण्याची मागणी जेएनपीटी बंदराचे व्यवस्थापन अधिकारी आणि उरणचे आमदार महेश बालदी यांच्याकडे केली होती. आमदार बालदी यांनी या भाडेवाढीसंदर्भात केंद्रीय मंत्री तसेच जेएनपीटी बंदराचे चेअरमन संजय सेठी, व्हाइस चेअरमन उन्मेश वाघ यांच्याबरोबर चर्चा करून भाडेवाढीला स्थगिती देण्याची मागणी केली. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि. 6) वसाहतीमधील रहिवाशांचे शिष्टमंडळ आणि जेएनपीटी बंदराचे व्यवस्थापन अधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
या वेळी जेएनपीटी बंदराचे व्हाइस चेअरमन उन्मेश वाघ यांनी वसाहतीमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळाला सांगितले की 31 मार्च 2021पर्यंत भाडेवाढीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे कुणीही वाढीव भाडे भरू नये आणि कुणी जास्तीचे भाडे भरले असेल तर ते पुढच्या भाड्यात कमी करण्यात येईल.
भाडेवाढीला स्थगिती देण्यात आल्याने जेएनपीटी वसाहतीमधील रहिवाशांच्या शिष्टमंडळातील गणेश अनंत ठाकूर, रामदास पाटील, विकास पाटील, प्रदीप कडू, सुरज पवार, गिरीष म्हात्रे आदी पदाधिकार्यांनी जेएनपीटी बंदराचे व्हाइस चेअरमन उन्मेश वाघ, जयवंत ढवळे, मनीषा जाधव तसेच आमदार महेश बालदी यांचे आभार व्यक्त केले. सोनारी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महेश कडू सोबत होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper