Breaking News

मंदिरे बंद, उघडले बार.. उद्धवा बेधुंद तुझे सरकार!; ठाकरे सरकारविरोधात भाजपचे आंदोलन, मंदिरे खुली करण्याची मागणी

मुंबई, शिर्डी ः प्रतिनिधी

अनलॉकमध्ये बहुतांश व्यवसाय आणि सार्वजनिक सेवा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र असे असले तरी राज्य सरकारने अद्यापही धार्मिक स्थळे खुली केलेली नाहीत. याचविरोधात भाजपने मंगळवारी (दि. 13) केले. राज्यातील विविध शहरे आणि जिल्ह्यांमधील प्रमुख मंदिरांसमोर भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलन करीत मंदिरे खुली करण्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी ‘घंटानाद’ करण्यार्‍या भाजपने मंदिर खुली करण्यासाठी मंगळवारी पुन्हा एकदा आंदोलन केले. शिर्डीत संत-महंत तसेच कार्यकर्त्यांनी लाक्षणिक उपोषण केले. तेथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलेल्या उत्तरावरून टीका केली. तुम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आज आवश्यकता निर्माण झाली आहे, असे ते म्हणाले. ‘दारूच्या दुकानात जाऊन कोरोना होणार नाही, पण मंदिरात जाऊन होणार आहे. तुम्ही सगळे उघडायला लागला आहात. ट्रेन सुरू झाल्या, विमाने सुरू झाली. मला उद्धव ठाकरे यांचे काही कळत नाही. अनेक विषयांत मला त्यांच्याबद्दल कळत नाही. असे का चालले आहे तेपण या विषयात बिलकुल कळत नाहीये त्यांचे नेमके काय म्हणणे आहे. कोरोना मंदिरात दबा धरून बसलेला आहे आणि परमेश्वराची साधना करायला येणार्‍यावर तो हल्ला करणार आहे का? मंदिरात जाऊन कोरोनाचा प्रार्दुभाव त्या व्यक्तीला होणार असेल, तर तो दारूच्या दुकानात, बसमध्ये, ट्रेनमध्ये जाऊन होणार नाही. काही कळतच नाही’, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. मुंबईमध्येही सिद्धिविनायक मंदिरासमोर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याबरोबरच भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महाराष्ट्रामध्ये बार आणि वाइन शॉप सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असली तरी मंदिरे मात्र बंद आहेत. दुर्दैव असे आहे की वाइन शॉप, बार सुरू झाले आहेत, मात्र कोविडच्या या परिस्थितीमध्ये जिथे जाऊन आम्ही नतमस्तक होतो, जिथे जाऊन मनाला शांती मिळेल ती मंदिरे उघडायची नाहीत. म्हणजे घरपोच आम्ही शेतकर्‍याचा भाजीपाला पोहचवू शकत नाही, पण दारू त्या ठिकाणी पोहचवू शकतो. कुठे हा महाराष्ट्र आपण घेऊन चाललोय, असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply