नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिका ही श्रीमंत महापालिका असून, सिडकोने पालिकेला कोविडसाठी 10 कोटी रुपये न देता महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी वापरावे. सिडकोने हे भवन उभारले असते तर पालिकेला आज खासगी रुग्णालये व हॉटेल्स कोविड रुग्णांसाठी भाड्याने घेण्याची वेळ आली नसती, त्यामुळे सिडकोने भवनाच्या उभारणीसाठी हा निधी वापरावा, अशी मागणी सिडको संचालक संजय मुखर्जी यांच्यासोबत सोमवारी झालेल्या बैठकीत केल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांबाबत देखील अनेक मागण्या केल्या असून त्याविषयी माहिती देण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी वाशीत पत्रकार परिषद घेतली या परिषदेत त्या बोलत होत्या. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, भाजप नवी मुंबई महामंत्री डॉ. राजेश पाटील, मा. नगरसेवक संपत शेवाळे उपस्थित होते.
नवी मुंबईतील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी सिडको सकरात्मक असून, 51 टक्के सभासद तयार असल्यास सिडको पुनर्विकास करेल असे आश्वासन सिडको संचालकांनी दिल्याचे आ. म्हात्रे यांनी सांगितले. तसेच चार एफएसआयसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देखील आमदार म्हात्रे म्हणाल्या. सद्यस्थितीत शासनाचे सर्व नियम पाळून सिटीसर्वेक्षण सुरु करण्यास हरकत नसावी तसेच ग्रामस्थांनी सादर करावयाची कागदपत्रांची पूर्ततेबाबत माहिती प्रसारित केल्यास पुढील कार्यवाही करण्यास मदत होईल. सिडकोने याबाबत पुढाकार घ्यावा. गावठाणातील बंधकामांवर कारवाई करू नये या मागणीला संचालकांनी सकारात्मकता दर्शवल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.