Breaking News

कृतिशील तत्त्वचिंतकाची जन्मशताब्दी

सुमारे पाच हजार वर्षांची पार्श्वभूमी लाभलेल्या श्रीमद भगवद् गीता या ग्रंथाविषयी समाजाच्या विविध स्तरांमधील आकर्षण अद्यापही कमी झालेले दिसत नाही. पाठांतर, प्रवचन अथवा विद्वानांच्या सभेत चर्चा या पातळीवर बव्हंशी भगवद् गीतेचे अस्तित्व साधारण प्रत्येक कालखंडात आढळत आले आहे. तथापि, ज्ञानयोग आचरणारे आद्य शंकराचार्य, भक्तियोगी संत ज्ञानेश्वर आणि कर्मयोगी लोकमान्य टिळक या विभूतींनी तत्कालीन गरजेनुसार गीतेचे मर्म समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे कार्य केले आहे. अलीकडच्या काळात गीतेतील कर्मप्रेरणेचा प्रवाह अधिक व्यापक आणि प्रशस्त होण्यासाठी पांडुरंगशास्त्री आठवले यांनी केलेल्या रचनात्मक प्रयत्नांची विशेष नोंद इतिहासकारांना सुवर्ण अक्षरातच घ्यावी लागेल.

‘योग’ आणि कर्मकर्तृत्व कसे करावे ते सांगण्यासाठी ‘गीतारहस्य’ लिहिणार्‍या लोकमान्य टिळकांचे महानिर्वाण ऑगस्ट 1920मध्ये झाले; आणि भगवद गीतेतीलच कर्मसिध्दांताचा अंगीकार सूत्रपध्दतीने करुन कृतिप्रवण समाज उभा करण्यासाठी आयुष्यपणास लावलेल्या पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म कोकणातीलच रोहे येथे 19 ऑक्टोबर 1920 यासरस्वती पूजन अर्थात अश्विन शुद्ध सप्तमीच्यादिवशी झाला. पांडुरंगशास्त्रींनी आपल्या ध्येयपूर्तीसाठी चोखळलेली वाट या पूर्वसुरींपेक्षा भिन्न आहे. शिवाय त्यांची विचारपध्दती, संघटना पध्दती आणि कार्यपध्दती देखील जरा आगळी आहे. त्यामुळेच लौकिकदृष्ट्या ते आज आपल्यात नसले तरी त्यांचे तेजस्वी जीवन, विचार, त्यांचे प्रचंड सत्कार्य आजही प्रेरणादायी ठरते आहे. कणाशून्य व चेहरा हरवलेल्या सामान्य माणसाला दैवी अस्मितेचा व तेजस्वितेचा भक्कम कणा त्यांच्या विचारप्रेरणेतून लाभला. त्यातून स्वाध्याय प्रवृत्तीच्या माध्यमातून जो विराट कर्मयोग उभा केला तो भावी पिढ्यांसाठी देखील प्रेरणादायी ठरणारा आहे.

भक्ती ही सामाजिक शक्ती आहे, असा उद्घोष करणार्‍या पांडुरंगशास्त्री आठवले यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष साजरे होत आहे. मुंबईतील माधवबाग येथील श्रीमद् भगवद् गीता पाठशाळेच्या माध्यमातून पांडुरंगशास्त्री यांचे कार्य सन 1942पासून सुरू होतेच. तथापि जून 1956पासून ठाणे येथे कार्यरत झालेल्या तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून या कार्यास संस्थात्मक अधिष्ठान प्राप्त झाले. याठिकाणी तत्त्वज्ञान विषयाच्या शिक्षणाबरोबर, लोकशिक्षणही सुरू केले गेले. समाजातील विविध स्तरांतील लोकांची प्रबोधनात्मक व प्रशिक्षणात्मक निवासी शिबिरे सुरू झाली. या शिबिरांमध्ये धर्म, संस्कृती, भारताचा सांस्कृतिक इतिहास, आधुनिक विचारप्रणाली, शंकराचार्यादि आचार्यांची भक्तिपूर्ण रसाळ स्तोत्रे यांसारख्या अनेक विषयांवर परिसंवाद व चर्चाही आयोजित करण्यात येत असत. स्वत: पांडुरंगशास्त्री या सर्व कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन करीत. प्रारंभापासूनच पांडुरंगशास्त्रींना कर्मकांडी भक्ती अभिप्रेत नव्हती. भक्ती म्हणजे मी त्या भगवंतापासून विभक्त नाही अशी ठाम समजूत. ही समजूत सर्वसामान्यापर्यंत रुजविण्यासाठी स्वाध्याय परिवाराची सांस्कृतिक पताका खांद्यावर घेतलेले अनुयायी देशभर भ्रमण करु लागले. धर्म संस्कृती विषयक ज्ञानाबरोबर कृतिभक्तिच्या रूपाने भक्तिफेरी हा अभिनव प्रयोग सुरू करण्यात आला. आपली भावभक्तिची वृत्ती दृढ करण्यासाठी उपनिषदे व गीता यांतील सद्विचार घेऊन स्वाध्यायी बंधुभगिनी नियमितपणे खेडोपाडी जाऊ लागले. त्यासाठी एकादशी, यज्ञ यासारख्या संकल्पनांचा नवा अन्वयार्थ करून लोकांना सांगितला गेला. त्यातून लोक ईश्वर कार्यार्थ प्रवृत्त झाले. प्रत्येक भक्तिफेरीची सांगता त्या त्या क्षेत्रातील निवडक लोकांची शिबिरे (धर्मयात्रा) त्या त्या क्षेत्रातच घेऊन होत असे. 1958 पासून भक्तिफेरी भारतातील विविध भागांमध्ये आणि अनेक इतर देशांमध्येही सुरू आहे.

पांडुरंगशास्त्रींनी भगवद् गीतेतील भक्ती योग आणि तत्त्वज्ञान याअनुषंगाने केवळ प्रवचने केली नाहीत, तर लाखो माणसांत ही समज जाणीवपूर्वक उभी केली. की माझं अस्तित्व कोणामुळे तरी आहे. याच उदात्त भावनेतून कृतज्ञता येते. ईश्वराच्या माझ्यातील अस्तित्वाच्या समजुतीमुळे माझा दीनपणा नष्ट होतो, अस्मिता जागृत होते, तेजस्विता येते. चराचर विश्व चालविणारा माझ्यात व दुसर्‍यात येऊन बसला आहे. या विचारामुळे माणसात भावमयता येते. ईश्वराने जसे माझ्यावर नि:स्वार्थ, निरपेक्ष प्रेम केले, तसे करण्याचा छोटासा प्रयत्न मी केला पाहिजे, अशी कृतिप्रवण करणारी एक निश्चित विचाराधारा लाखो लोकांमध्ये निर्माण करणे, व्यक्तीव्यक्तींमधील परस्पर भावनिक ऐक्य तसेच व्यक्तीमधील भावजागृती व अस्मिता जागृती हेच रचनात्मक कार्य आहे, अशा विचारधारेवर जागणारा, दैवी भ्रातृभाव जपणारा, गावागावात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारा एक प्रगल्भ व संस्कारी समाज पांडुरंगशास्त्रींनी उभा केला आहे. विशेष म्हणजे या समाजास लाभलेल्या अधिष्ठानाचा पाया श्रीमद् भगवद् गीतेतील तत्त्वज्ञानावर आधारित असल्यामुळे हा समाज आणि त्याचे कार्य चिरंतन टिकणारे असेल, हे नक्की.

भारतभूमीतील या असामान्य कृतिशील तत्त्वचिंतकाला त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त भावपूर्ण वंदन!

-संजय पाटील

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply