सुधागडातील आदिवासींचा जगण्यासाठी संघर्ष सुरु
पाली : प्रतिनिधी
लॉकडाऊन जाहीर करताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला धान्य देण्याची घोषणा केली होती. त्याला आज एक महिना उलटून गेला तरी अद्यापही आदिवासी समाजातील लोकांना रेशन मिळाले नसल्याचे समोर आले आहे. कोरोना संकटात सुधागड तालुक्यातील गोरगरीब आदिवासी बांधव आणि हातावर पोट असणारे घटक राज्य शासनाच्या मदतीची प्रतीक्षा करीत आहेत.
कोरोना महामारीचे संकटाला रोखण्यासाठी ’ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत राज्यात 15 एप्रिलपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. तो जाहीर करताना गरीब जनतेसाठी मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. पण एप्रिल संपून मे महिना सुरू झाला तरी सुधागड तालुक्यातील आदिवासी वाड्यापाड्यात, गाव खेड्यांत अद्याप सदर धान्याचे वाटप झाले नसल्याचे समोर आले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मोफत धान्य पुरवठा करण्यात येईल. अशी घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या योजनेतील मोफत धान्य संबंधीत रेशनिंग दुकानांपर्यंत पोहचविण्याचे काम अद्याप सुरूच आहे.
गोरगरिबांना मोफत धान्य देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र, महिना उलटून गेला तरी अजून आम्हाला धान्य मिळाले नाही. आदिवासी बांधवांना सध्या रोजगार नाही, कोण कामाला घेत नाही. अशा परिस्थितीत आम्ही आदिवासी बांधवांनी खायचे काय? आणि जगावे कसे?, असे दहिगाव (ता. सुधागड) आदिवासी वाडीतील उपसरपंच रामचंद्र जाधव यांनी सांगितले.
कोरोना महामारीत गोरगरीब जनतेचे अन्नधान्यावाचून हाल होत आहेत. शासनाने घोषित केलेले धान्य लाभार्थी घटकाला लवकर मिळावे. त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा. म्हणून आम्ही तहसील कार्यालयात निवेदन दिले आहे. सरकारने त्याचा जलद विचार करावा, असे युवा कार्यकर्ते सुनिल साठे म्हणाले.
आम्हाला अद्याप धान्य मिळाले नाही. मजूरीवरदेखील कोणी घेत नाही, अशी व्यथा दिव्यांग बांधव प्रकाश वाघमारे आणि आदिवासी कार्यकर्ते रमेश पवार यांनी बोलून दाखविली.