Breaking News

नेरूळ गाव बनतेय हॉटस्पॉट

गावातील मुख्य मार्गावर अद्यापही गर्दी

नवी मुंबई : बातमीदार – नवी मुंबईत कोरोनाने हाहाकार माजवलेला असतानाच सर्वाधिक लोकसंख्येचा विभाग मानला जाणार नेरुळ विभाग देखील मागे राहिलेला नाही. यातील महत्वाची बाब म्हणजे नेरुळ गावात कोरोनाचा शिरकाव झाला असून अजिमितीस 11 रुग्ण सापडले असून ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

नेरुळ गावात कोरोनामुळे काळजीचे वातावरण आहे. त्यात नेरुळ गाव हे रेल्वे स्थानकालागत असल्याने गावात परप्रांतीय नागरिकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यात बैठी असलेली घरे ही डौलदार झाली असून काहींनी तर चाळीच उभारल्या आहेत. अतिशय दाटीवाटीने उभारलेल्या इमारती म्हणजे उभ्या चाळींचा भास होत असल्याने सुटसुटीत घरांमधील अंतर संपुष्टात आले आहे. कोरोना विषाणू या गावात पोहोचल्याने नागरिकांमध्ये भयभीत वातावरण तयार झाले आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास पालिका सांगत असताना गावातील दाटीवाटीने उभारलेल्या घरांमुळे सुरक्षिततेचे नियम पाळणे अवघड झाले आहे.

त्यात गावातील रस्ते दररोज गर्दीने फुलून जाऊ लागले आहेत. याबाबत एकबाजूने भूमिपुत्र नागरिकांनी काही दिवस स्वतः हातात काठ्या घेऊन जनजागृती करण्याचा, नागरिकांना जरब बसवण्याचा व गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याचा काहीही फायदा होत नसल्याचे पाहून ग्रामस्थ हतबल झाले आहेत. त्यात गावात नियमित बसणार्‍या फेरीवाल्यांव्यतिरिक्त अनेक नव्या फेरीवाल्यांचा उदय झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामुळे अगदी अरुंद रस्त्यांवर देखील दुतर्फा गर्दी दिसत आहे.

गावातील अनेक नागरिकांचा रोजगार गेल्याने त्यांनी भाजी विक्री करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने ही गर्दी कमी करण्यासाठी गावदेवी येथील मोकळे मैदान घेणे गरजेचे आहे. त्यासोबत बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई करणे गरेजचे आहे.

-गिरीश म्हात्रे, नगरसेवक, नेरुळ गाव

लोकप्रतिनिधींकडून दररोज सकाळी सकाळी मुख्य रस्त्यांवर जाऊन सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करणे गरजेचे आहे. तुर्भे गावात भाजपचे नगरसेवक रामचंद्र घरत यांनी अशा जनजागृतीस सुरुवात केली आहे. सातत्याने लोकप्रतिनिधी, पालिका व पोलिसांनी या जनजागृतीकडे लक्ष दिल्यास नागरिकांमध्ये बदल घडू शकतो. नेरुळ गावात देखील घणसोली गावाप्रमाणे नियमावली आखण्याची गरज आहे. घरपोच किराणा, दूध पोहोचवल्यास प्रादुर्भाव रोखता येईल.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply