Breaking News

खारघरच्या डोंगरांमध्ये वाघ असल्याची अफवा

वनविभागाकडून माध्यमांतील वृत्ताचे खंडण; व्हायरल व्हिडीओमधील दृष्ये

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याचे वृत्त सोमवारी रात्री समाजमाध्यमांवर झळकले. तसेच विविध बातम्यांमधून वाघ दिसला असल्याच्या शक्यता मंगळवारी (दि. 1) वर्तवण्यात आल्या होत्या, मात्र खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याचे वृत्त खोट असल्याचे एका वन अधिकार्‍याने सांगितले आहे. खारघरच्या डोंगरांमध्ये वाघाचा वावर असल्याने येथील आदिवासी वाड्यांवरील लोकवस्ती धास्तावली आहे. गेल्या महिन्याभरात वाघाचा तीन वेळा वावर दिसला आहे. पहिल्या दोन घटनांमध्ये टाटा पावर कंपनीचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना या परिसरात वाघ दिसला. तसेच दोन आठवड्यापूर्वी बेलापूरकडून खारघर हिलवरील चाफेवाडी आदिवासी वाडीकडे जाण्याच्या रस्त्यावर बोगद्याजवळ पारधी कुटूंबीयांनी हाकेच्या अंतरावरून वाघाला पाहिले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे, अशा आशयाच्या बातम्या समाजमाध्यमांवर प्रसिद्ध झाल्या. तसेच याबाबतची व्हिडीओ क्लीपदेखील व्हायरल झाली. वाडीतील एका जागरुक व्यक्तीने खारघर हिलवर वाघ असल्याची लेखी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना आणि वनविभाग तसेच सिडकोच्या सूरक्षा विभागाला दिली. खारघर हिलवर नेहमी सायंकाळी व पहाटे वॉकींगसाठी शेकडो खारघरवासियांची ये-जा सुरू असते. या तीनही घटनांमध्ये वाघाची माहिती सिडको सूरक्षा विभागाने वन विभागाला दिल्याचे सूरक्षा विभागाचे बाळू पाटील यांनी सांगितले, असेही प्रसिद्ध झाले होते.दरम्यान, खारघर परिसरात वाघाचा वावर या बातमीची सत्यता समजण्यात यावी, अशी मागणी भाजप खारघर सरचिटणीस दीपक शिंदे यांनी पनवेल वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांच्याकडे केली होती. यात त्यांनी आपल्या वनपरिक्षेत्रात मंगळवारी (दि. 1 नोव्हेंबर) काही वृत्तपत्रांमध्ये खारघरच्या डोंगरावर वाघाचा वावर असल्याची बातमी प्रसिद्ध झाली. पंधरा दिवसांपूर्वीसुद्धा टाटा पॉवर कंपनीच्या कर्मचार्‍यांनी व चाफेवाडी येथील पारधी कुटुंबीयांनी या परिसरात वाघाला पाहिल्याचे वृत्त वाचनात आले. या खारघर हिल्सवर अनेक नागरिक मॉर्निंग वॉकला जातात तसेच चाफेवाडी व फणसवाडीसारख्या पाड्यात आदिवासी बांधव राहात आहेत. त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरल्याचे सुद्धा ऐकण्यात येत आहे. या बातमीतील सत्यता अजून अधिकृतपणे जाहीर करून सत्यता नागरिकांना समजावी. बातमी खरी असेल तर वाघ पकडण्यासाठी प्रयत्न लागेल तसेच नागरिकांना सुरक्षेच्या हेतूने या परिसरात येण्या-जाण्यापासून मज्जाव करावा लागेल, जेणेकरून कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही, अशा आशयाचे पत्र वनविभागाकडे शिंदे यांनी पाठविले होते. तसेच या पत्राची प्रत पनवेल महापालिका आयुक्त, पनवेलचे आमदार, खारघर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पाठविली होती. यानुसार पनवेल वन परिक्षेत्र अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी खारघर परिसरात वाघाचा वावर असल्याची बातमी खोटी असल्याचे आमच्या प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply