पनवेल ः वार्ताहर
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर शुक्रवारी काही अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला. पनवेलजवळील वडघर येथे महेश साळुंखे यांच्या राहत्या घरासमोर शुक्रवारी रात्री अज्ञात इसमांनी त्यांना तसेच त्यांची पत्नी सोनू यांना किरकोळ वादावरून शिवीगाळ करून मारहाण तसेच धमकी दिली.
याबाबत त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 143, 147, 149, 324, 323, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे युथ रिपब्लिकन पक्षप्रमुख मनोज संसारे यांनी पनवेल येथे धाव घेऊन संबंधित घटनेची माहिती घेत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पोलिसांनी तत्काळ संबंधित आरोपींना अटक करावी तसेच यापुढेही महेश साळुंखे व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याने पोलिसांनी याबाबत उपाययोजना करण्याची मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.