अलिबाग : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप व मित्रपक्ष युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी गनिमी काव्याने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी अलिबाग तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत गोंधळी आणि शेकापचे नेते बाळ तेलंगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे चर्चेला उधाण आले आहे.
गीते यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे सुनील तटकरे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना काँग्रेस व शेकापचा पाठिंबा आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सहकारी असलेल्या काँग्रेस व शेकापच्या दुसर्या फळीतील नेत्यांची भेट घेऊन गीते यांनी धक्कातंत्राचा अवलंब केला आहे. विशेष म्हणजे या भेटी गुप्त न ठेवता त्याची छायाचित्रेदेखील सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
या भेटीवेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, ज्येष्ठ नेते विजय कवळे आदी उपस्थित होते. गोंधळी, तसेच तेलंगे यांनी गीते यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
