रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडीची मागणी
पनवेल : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात रोहे, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात सिडकोच्या माध्यमातून नवनगर उभारण्याची घोषणा माजी मुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून अधिसूचना काढली होती. परंतु महाविकास आघाडी सरकारने ती अधिसूचना रद्द केल्यामुळे रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडी तर्फे नवीन अधिसूचना रद्द करण्याच्या मागणीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांना शनिवारी निवेदन देण्यात आले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड जिल्ह्याचा विकास होण्यासाठी रोहे, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात एकात्मिक औद्योगिक वसाहतीसह सिडकोच्या माध्यमातून नियोजनयुक्त वैधानिक स्वरूपाचे नवनगर विकास प्राधिकरण स्थापन करण्यात आले होते. त्याची प्रक्रिया सुरू होऊन 13,409 हेक्टर जामीन संपादन करण्यासाठी एजन्सी नेमण्याचे काम अंतिम टप्प्यात होते. परंतु नवीन महाविकास आघाडीच्या सरकारने 8 ऑक्टोबर 2020 रोजी अधिसूचना रद्द करून त्याठिकाणी 9,566 हेक्टरवर औषध निर्माण उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे रोहे, मुरुड आणि अलिबाग तालुक्यातिल लोकांना रोजगार उपलब्ध होण्याची संधि आता कमी होणार आहे. या भागातील पायाभूत सुविधा, 40 वर्षांपासून रखडलेली धरणे, पाणी पुरवठा योजना यांना चालना मिळणार होती, पण ही अधिसूचना रद्द केल्याने आता या भागाचा विकास होण्याचा मार्ग खडतर झाला असल्याने रोहे-मुरुड औद्योगिक व नागरी विकास आघाडी तर्फे सिडको मार्फत आम्हाला औद्योगिकरणासह शहरीकरण पण पाहिजे म्हणून शेकडो नागरिकांच्या सहयांचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि रायगड जिल्हयातील लोकप्रतिनिधींना देण्यात येत आहे. शनिवारी भाजपचे उत्तर रायगडचे अध्यक्ष व पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रवर्तक प्रकाश विचारे, काशीनाथ भोईर व त्यांच्या सहकार्यांनी देऊन विधानसभेत ही अधिसूचना रद्द करण्यासाठी आवाज उटवण्याची मागणी केली.
रोहे, मुरुड आणि अलिबाग तालुक्यात एकात्मिक औद्योगिक वसाहतीसह सिडकोच्या माध्यमातून नियोजनयुक्त वैधानिक स्वरूपाचे नवनगर विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबतच्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी विधिमंडळात याबाबत प्रश्न उपस्थित करीन आणि रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी निश्चित आपल्या सोबत राहीन.
-आमदार प्रशांत ठाकूर