Breaking News

दिवाळीनंतर पनवेलमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले

पनवेल : रामप्रहर वृत्त

गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात आलेली कोरोनाबाधितांची संख्या दिवाळी सणानंतर वाढू लागल्याने पनवेलकरांची चिंता वाढली आहे. तीन दिवसांपूर्वी प्रति दिवस 19 नवे रुग्ण आढळल्यानंतर मंगळवारी 31 आणि बुधवारी 60 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये पुन्हा कोरोना संकटाला सामोरे जाण्याची भीती व्यक्त होऊ  लागली आहे.

रुग्णवाढ होऊ लागल्याने पालिका प्रशासनाने पुन्हा एकदा खाटांची संख्या वाढवण्याची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. दोन धर्मादाय रुग्णालयांसोबत करार रद्द केल्यामुळे पालिकेच्या हक्काच्या उपजिल्हा रुग्णालयात अवघे आठ अतिदक्षता खाटा उपलब्ध असून त्यापैकी सर्वच खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे रुग्णवाढ वाढत गेल्यास अत्वस्थ रुग्णांचा प्रश्न निर्माण होणार आहे.

पनवेलमध्ये कोरोनामुळे 570 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून 14538 जण बाधित झाले आहेत. सध्या 410 रुग्ण कोरोना संसर्गावर उपचार घेत आहेत. पनवेल पालिकेचे आरोग्य विभागाचे उपायुक्त संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेकडे टीआर सभागृहात अडीचशे खाटांचे नियोजन आहे तर वेळ पडल्यास इंडिया बुल येथे दोन हजार खाटा उपलब्ध होतील.  याव्यतिरिक्त उपजिल्हा रुग्णालयात 130 प्राणवायू खाटांचे नियोजन आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी पनवेलसाठी तीन महिन्यांपूर्वी 53 कृत्रिम श्वसन यंत्रणा खाटांची उपलब्धता केली होती. त्यापैकी दहा खाटा पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात तर 33 खाटा कामोठे येथील एमजीएम व नेरुळ येथील डी वाय पाटील रुग्णालयांना दिल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यास जिल्हाधिकारी या दोन्ही रुग्णालयांकडून तातडीची मदत घेऊ  शकतील असे नियोजन आहे.

नियमांचा भंग

दिवाळीच्या काळात काही नागरिकांनी जमाव जमविणे, मास्क न घालणे, सामाजिक अंतर न पाळणे व हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीला हरताळ फासल्याने हे संकट ओढवले आहे. तसेच नागरिकांनी दिवाळीत पालिकेच्या निर्देशांचे पालन न केल्याने  कोरोनाग्रस्तांची संख्या मागील तीन दिवसांत वाढल्याचे प्रशासनाचे मत आहे.

नवी मुंबईतही रुग्णसंख्या वाढीची चिंता

गेले आठ दिवस शंभरच्या खाली असलेली कोरोनाबाधितांची संख्या बुधवारी 131 पर्यंत गेली आहे. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुढील काळात रुग्णसंख्यावाढीची चिंता व्यक्त होत आहे. नवी मुंबईत एकूण 46,444 कोरोनाबधित झाले आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर 95 टक्के आहे. रुग्णसंख्या कमी होत असल्याने दिलासा मिळत होता. मात्र दिवाळीत झालेली गर्दी पाहता पुढील काळात रुग्णवाढ होण्याची शक्यता आहे. बुधवारी 131 नवे बाधित आढळले आहेत. तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply