Tuesday , March 21 2023
Breaking News

चेन्नईची विजयी हॅट्ट्रिक

चेन्नई : वृत्तसंस्था

कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी (दि. 31) घरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव केला. चेन्नईच्या 175 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारता आली. याबरोबरच चेन्नईने विजयाची हॅट्ट्रिक साधली; तर राजस्थानची ही सलग तिसरी हार ठरली.

राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केल्याने चेन्नईचे तीन फलंदाज फक्त 27 धावांत बाद झाले, पण त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि सुरेश रैना यांनी संघाला सावरले. धोनीने नाबाद 75 धावा करताना आयपीएलमधील दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक आणि चेपॉकवरील सर्वोत्तम खेळीची नोंद केली. रैनाने 32 चेंडूंत 36 धावा केल्या. या दोघांनी 61 धावांची भागीदारी नोंदविली; तर धोनीने ड्वेन ब्राव्होसह 56 धावांची भागीदारी केली.

चेन्नईच्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्यानंतर राजस्थानने 14 धावांत अजून दोन फलंदाज गमावले. त्यानंतर राहुल त्रिपाठी (39) आणि स्टीव्हन स्मिथ (28) यांनी राजस्थानचा डाव सावरला, मात्र हे दोघे बाद झाल्यावर बेन स्टोक्सने संघाचे आव्हान जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकामध्ये स्टोक्सच्या रूपात राजस्थानला मोठा धक्का बसला. स्टोक्सने 26 चेंडूंत 46 धावा केल्या. अखेर चेन्नईने सामना जिंकत सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकाविलेे.

…अन् धोनी बाद होता होता वाचला

चेन्नई : चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या बाबतीत या सामन्यात एक अनोखा योगायोग पहायला मिळाला. घरच्या मैदानावर खेळत असताना राजस्थान रॉयल्सविरुद्ध सामन्यात चेन्नईचे पहिले तीन फलंदाज झटपट माघारी परतले. यानंतर धोनी मैदानात आला. जोफ्रा आर्चर टाकत असलेल्या सहाव्या षटकादरम्यान एका चेंडूने धोनीला पुरते चकवले. या वेळी चेंडू स्टम्पला जाऊन लागला, मात्र बेल्स न पडल्यामुळे धोनी बाद होता होता वाचला. मग मात्र धोनीने राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई केली.

Check Also

शासकीय कर्मचार्‍यांचा संप अखेर मागे!

सरकासोबत चर्चा यशस्वी मुंबई : प्रतिनिधी गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांचा संप …

Leave a Reply