Breaking News

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून

रोह्यातील घटना; आरोपी गजाआड

रोहे ः प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील तांबडी बुद्रुक येथील 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याची घटना समोर आली असून, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी 22 वर्षीय आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आवळल्या आहेत. मुलीवर रविवारी अत्याचार करून तिचा मृतदेह तांबडी-ताम्हणशेत रस्त्यालगत असलेल्या दरीत टाकण्यात आला होता. ही बाब सोमवारी (दि. 27) उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासचके्र फिरवित या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला.
तांबडी ब्रुद्रुक येथील 14 वर्षीय मुलगी तीन किमी अंतरावर असलेल्या ताम्हणशेत येथे आपल्या आजी-आजोबांकडे नेहमीच जात असे. अशाच प्रकारे रविवारी सायंकाळी 5.45च्या सुमारास ताम्हणशेत येथे गेल्यानंतर ती परत आलीच नाही. त्यामुळे पालकांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने तिचा शोध सुरू केला असता, तांबडी-ताम्हणशेत मार्गावर हिरडीचे टेप येथे तिची दुचाकी गाडी दिसली. शेजारीच असलेल्या दरीतील वावळ्याचा कोंड या ओहळाच्या मध्यभागी मोठ्या दगडावर विवस्त्रावस्थेतील तिचा मृतदेह आढळला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर जिल्हा अधीक्षक सचिन गुंजळ यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी मुंबई येथे पाठविला. त्यानंतर तपास सुरू केला. या वेळी 22 वर्षांच्या इसमाला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply