Breaking News

देशाला `वन नेशन, वन इलेक्शन`ची गरज

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुनरूच्चार; संविधान दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या प्रगतीसाठी ’वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज असल्याचा पुनरूच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे.
संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (दि. 25) अखिल भारतीय पीठासीन अधिकार्‍यांच्या संमेलनाला संबोधित केले. या वेळी त्यांनी ’वन नेशन, वन इलेक्शन’बद्दल गांभीर्याने विचारमंथन आवश्यक असल्याचे म्हटले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ’वन नेशन, वन इलेक्शन’ केवळ विचारमंथनाचा विषय नाही. ही देशाची गरज आहे. आता आपल्याकडे काही महिन्यांनी देशात कुठे ना कुठे निवडणूक होत असतात. त्यामुळे विकासकामांमध्ये अडथळा येतो. देशाच्या प्रगतीचा वेग मंदावतो. याबद्दल आपण गांभीर्याने विचार करायला हवा. लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांसाठी केवळ एका मतदारयादीचा वापर व्हायला हवा. आपण या मतदारयाद्यांवर पैसा आणि वेळ का खर्च करतोय,
असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
या वेळी पंतप्रधानांनी देशातील जनतेला संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. संविधानाच्या निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मी आभारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्यापासून संविधान तयार करण्यात हातभार लावलेल्या प्रत्येकाला मी नमन करतो. त्यांच्यामुळेच देशाला संविधान मिळाले. पूज्य बापूंकडून मिळणारी प्रेरणा आणि सरदार पटेल यांची वचनबद्धता यांना प्रणाम करण्याचा आजचा दिवस आहे, असे ते म्हणाले.
मुंबईतील शहिदांना श्रद्धांजली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात 12 वर्षांपूर्वी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरही भाष्य केले. ’आजच्याच दिवशी, 12 वर्षांपूर्वी देशावर सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. यात अनेक पोलीस शहीद झाले, नागरिकांचा मृत्यू झाला. त्यांना मी श्रद्धांजली वाहतो,’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply