Breaking News

रायगडचा मिडलाईन क्लब राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषकाचा मानकरी

कबड्डी स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमध्ये झालेल्या राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेच्या अंतिम रोमांचक लढतीत सरस कामगिरी करीत रायगड जिल्ह्याच्या मिडलाईन स्पोर्ट्स क्लबने (कर्जत) विजेतेपद पटकाविले, तर रत्नागिरी चिपळूणच्या दसपट्टी संघ उपविजेता ठरला. मिडलाईन क्लबचा सुयोग गायकर व दसपट्टी मंडळाचा अभिषेक भोजने स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
अत्यंत उत्तम आणि शिस्तबद्ध आयोजनामुळे प्रो कबड्डीचा थरार महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळाने धरणा कॅम्प येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळाला. रविवारी रात्री झालेल्या स्पर्धेच्या अंतिम दिवशी एकाहून एक दिलखेच सामने पहायला मिळाले. या स्पर्धेतील विजेत्यांना रायगडचे माजी पालकमंत्री तथा आमदार रवींद्र चव्हाण, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या वेळी आमदार रवींद्र चव्हाण आणि आमदार निरंजन डावखरे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल कौतुक केले.
पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक मालोजी भोसले, भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, नगरसेवक हरेश केणी, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक नितीन पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, नगरसेविका राजेश्री वावेकर, मोनिका महानवर, युवा नेते दिनेश खानावकर, दिनेश केणी, राजेश मपारा, सोपान जांभेकर, पंच प्रमुख सतिश सूर्यवंशी, सूर्यकांत ठाकूर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाष कदम, युवा नेते समीर कदम, सतिश कदम, मंडळाचे अध्यक्ष शेखर कदम, सचिव प्रशांत कदम, खजिनदार जितेंद्र कदम यांच्यासह पदाधिकारी, ग्रामस्थ आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रात हुतूतू बंगालमध्ये हुडूडू चेन्नईत चेडूयुडू केरळमध्ये वंडीवडी उत्तर भारतात कोनवरा, साबरगण्णा पंजाब राज्यात झाबर गंगा, सौची पक्की अश्या वेगवेगळ्या नावांनी आणि थोडयाफार फरकाने हा खेळ खेळला जात होताच, पण या खेळाला सर्वदूर एकच नाव असावे याकरिता महाराष्ट्र राज्याने प्रयत्न केले आणि अनेक भाषांची ही प्रादेशिकता जाऊन भारतात हा खेळ ’कबड्डी’ या नावाने ओळखला जातो. या मैदानी खेळाने देशात क्रीडा प्रकारात एक मानाची उंची राखली. या खेळाला आणि खेळाडूंना सन्मान देण्याचे काम पनवेल तालुक्यातील धरणा कॅम्प येथे झालेल्या राज्यस्तरीय आमदार प्रशांत ठाकूर चषक भव्य दिव्य कबड्डी स्पर्धेने केले. मैदानी खेळाची ही परंपरा टिकवण्यासाठी नवनवीन संकल्पना आखण्यात येतात त्याच अनुषंगाने जणू प्रो कबड्डीचे सामने या मैदानावर होत आहेत आणि एकाहून एक सरस चढाईने यामध्ये रोमांचक थरार पहायला मिळाला. हार-जीत होतच असते, पण शिस्तबद्ध आणि सुंदर नियोजन या ठिकाणी डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. कबड्डीतील ज्येष्ठ खेळाडूंचा सन्मानही या ठिकाणी होताना त्यांच्या प्रती आदरभाव अधोरेखित होत होता.
सूत्रसंचालन प्रो कबड्डीचे प्रसिद्ध समालोचक मिलिंद पाटील व किशोर गावडे यांनी केले. त्यांनी आपल्या वक्तृत्व शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. 22 ते 24 एप्रिलपर्यंत रंगलेल्या या स्पर्धेत अनेक सामने थरारक झाले. शेवटच्या क्षणापर्यंत निकाल काय लागणार याची उत्कंठा शिगेला पोहचली होती आणि त्याचा मनमुराद आनंद प्रेक्षकांनी अनुभवला.
सविस्तर निकाल  
विजेता संघ-मिडलाईन मिडलाईन स्पोर्ट्स क्लब कर्जत-रायगड (बक्षीस एक लाख रुपये व आमदार चषक), उपविजेता संघ-दसपट्टी चिपळूण-रत्नागिरी (बक्षीस 50 हजार रुपये व आमदार चषक), उपांत्य विजयी संघ-शिवशंकर मंडळकल्याण-ठाणे (बक्षीस 25 हजार रुपये व आमदार चषक), उपांत्य विजयी संघ-गोल्फादेवी मंडळ मुंबई (बक्षीस 25 हजार रुपये व आमदार चषक), मालिकावीर सुयोग गायकर-रायगड (दुचाकी मोटरसायकल) आणि अभिषेक भोजने, रत्नागिरी (दुचाकी मोटरसायकल), उत्कृष्ट चढाई-ओमकार कदम, रत्नागिरी (बक्षीस 10 हजार रुपये व चषक), उत्कृष्ट पकड-प्रतिक बैलमारे, रायगड (10 हजार रुपये व चषक), पहिला दिवसाचा मानकरी-संतोष हिप्परकर, सांगली (पाच हजार रुपये आणि चषक) दुसर्‍या दिवसाचा मानकरी-विनोद आत्तलकर, मुंबई शहर (पाच हजार रुपये आणि चषक), उदयोन्मुख खेळाडू-सिद्धेश पिंगळे, गोल्फादेवी मंडळ मुंबई (पाच हजार रुपये आणि चषक).

या गावातून अनेक खेळाडू महाराष्ट्राच्या संघाला मिळाले आहेत. त्यामुळे त्या खेळाडूंची इच्छा होती की येथे राज्यस्तरीय स्पर्धा व्हावी. त्या अनुषंगाने ही बाब आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे मांडली. त्यांनी ताबडतोब होकार दिला आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा बहुमान त्यांनी जय भवानी नवतरुण मंडळाला दिला. त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर यांचे विशेष आभार मानते.
-संजना कदम, सभापती, प्रभाग समिती ’अ’, पनवेल महानगरपालिका

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply