Breaking News

कंगनाविरोधातील कारवाई सूडबुद्धीने

मुंबई हायकोर्टाने महापालिकेला फटकारले

मुंबई : प्रतिनिधी
अभिनेत्री कंगना रणौतविरोधात मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे तसेच पालिकेकडून पाठवण्यात आलेली नोटीसही हायकोर्टाने रद्द केली आहे.
मुंबई महापालिकेकडून कंगनाच्या जुहू येथील कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली होती. या विरोधात कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी शुक्रवारी (दि. 27) न्यायालयाने निर्णय दिला. कंगनाच्या कार्यालयावरील बेकायदा बांधकामावर केलेली कारवाई सूडबुद्धीने असल्याचे सांगत उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटकारले आहे.
कंगनाने महापालिकेविरोधात नुकसानभरपाईचा दावा ठोकला असून, उच्च न्यायालयाने कारवाईमुळे काय नुकसान झाले याचे मूल्यांकन करण्यासाठी अधिकार्‍याची नियुक्ती केली आहे तसेच यापुढे कारवाई करण्यापूर्वी पालिकेने सात दिवसांची नोटीस द्यावी, असे न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे.
महापालिका अधिकार्‍याकडून नोटीस काढणे, तिच्या बंगल्यावर चिकटवणे, कारवाईचा आदेश, कारवाईसाठी केलेली तयारी, सुनावणी पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न, 40 टक्केच कारवाई होणे, संजय राऊत यांनी कारवाईनंतर उखाड दिया म्हणणे हे सर्व याचिकाकर्त्यांच्या दाव्याचे समर्थन करणारे आहे, असे उच्च न्यायालयाने निकाल सुनावताना म्हटले. कंगना कार्यालयाचा ताबा घेऊ शकते, असेही कोर्टाने या वेळी स्पष्ट केले.
‘संजय राऊतांची बोलतीच बंद झाली’
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सोमय्या यांनी, कंगना रणौत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुंबईच्या महापौरांनी आणि पालिका आयुक्तांनी आता राजीनामा द्यायला हवा. संजय राऊत यांची तर बोलतीच बंद झाली आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा एखादी व्यक्ती सरकारविरोधात उभी राहते आणि विजय मिळवते तेव्हा हा त्याचा एकट्याचा नाही तर लोकशाहीचा विजय असतो. मला हिंमत देणार्‍या सर्वांचे आभार आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसणार्‍यांचेही आभार. कारण तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले.
-कंगना रणौत, अभिनेत्री

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply