Breaking News

कोर्टालाही महाराष्ट्रद्रोही ठरविणार का? 

देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकार सत्तेत येऊन शुक्रवारी (दि. 27) एक वर्ष पूर्ण झाले. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आधार घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कंगनाविरोधात करण्यात आलेल्या कारवाईवरून महापालिकेला फटकारले, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांच्या अटकेवरून राज्य सरकारला सुनावले आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करीत, ‘एकाच दिवशी देशातील दोन न्यायालयांचे निकाल एका प्रकारे सरकारच्या वर्षभरातील कामगिरीचा सार सांगणारेच आहेत. आता प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयालासुद्धा हे महाराष्ट्रद्रोही ठरविणार का, असा सवाल केला आहे.
आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आहे याचा विसर या राज्य सरकारला पडला. पोलीस, फौजदारी कायदे जनतेच्या संरक्षणासाठी असतात, त्यांच्या छळवणुकीसाठी नाहीत. हे जर न्यायालयांना सांगावे लागत असेल, तर आपली सद्सद्विवेकबुद्धी-संविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का हा प्रश्न निर्माण होतो, असेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
सत्तेतील नेते सत्तांध झाल्याने ज्या घटना अलीकडच्या काळात महाराष्ट्रात घडल्या त्यावर सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे निकाल ही सरकारला सणसणीत चपराक आहे. सरकारविरोधी निघणारा प्रत्येक आवाज हा अशा प्रकारे चिरडून टाकता येत नसतो हे आता तरी त्यांनी लक्षात घ्यावे, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply