Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांचा रिलायन्स प्रकल्पग्रस्तांना पाठिंबा; आंदोलनस्थळी दिली भेट

नागोठणे : प्रतिनिधी
रिलायन्स प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या रास्त आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही आमदार रविशेठ पाटील यांनी शनिवारी (दि. 28) नागोठणे येथे दिली.
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांची तड लावण्यासाठी येथील रिलायन्स (पूर्वीची आयपीसीएल) प्रकल्पग्रस्तांनी लोकशासन आंदोलन संघर्ष संघटनेच्या माध्यमातून शुक्रवार (दि. 27)पासून कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन सुरू केले आहे. शनिवारी दुपारी आमदार रविशेठ पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. येथे येण्यापूर्वी आपल्या मागण्यांसंदर्भात रिलायन्सच्या वरिष्ठ अधिकार्‍यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासी संकुलात गेलो होतो, मात्र एकही अधिकारी भेटू शकला नाही. त्यांच्याशी संपर्क साधला असता सर्वांनीच नागोठण्याबाहेर असल्याचे सांगितले. सोमवारी त्यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार पाटील यांनी या वेळी दिली.
तत्पूर्वी शुक्रवारी संध्याकाळी संघटनेचे अध्यक्ष बी. जी. कोळसे -पाटील यांनी नागोठण्यात येऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. या वेळी बोलताना त्यांनी आपल्या मागण्या रिलायन्सने मंजूर केल्याशिवाय येथून उठायचे नाही, असा सूचनावजा आदेश आंदोलनकर्त्यांना दिला. संघटनेचे राष्ट्रीय संघटक राजेंद्र गायकवाड, शशांक हिरे, गंगाराम मिणमिणे, प्रमोदिनी कुथे, चेतन जाधव, सुरेश कोकाटे, बळीराम बडे यांच्यासह शेकडो प्रकल्पग्रस्त या वेळी उपस्थित होते.
दरम्यान, कोळसे-पाटील यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले माणगावचे डीवायएसपी रणजित पाटील आणि नागोठणे पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब घुटुकडे यांच्याशी 10 मिनिटे चर्चा केली. चर्चा एकांतात झाल्याने तपशील समजू शकला नाही. दुसर्‍या दिवशी शनिवारी दुपारपर्यंत रिलायन्स तसेच एकाही सरकारी अधिकार्‍याने आंदोलनाच्या ठिकाणी भेट दिली नसल्याचे स्पष्ट होत आहे.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply