पनवेल : वार्ताहर
विना परवाना ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या ताब्यात ठेवून सदर पदार्थ हा डिझेल असल्याचे सांगून काही कंटेनरचालकांना त्याची विक्री व साठा करणार्याविरूद्ध गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलने तालुक्यातील पनवेल-शीळफाटा रोडलगत हिंदुस्थान विवेक ढाब्याशेजारी छापा टाकून याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात उभ्या राहणार्या कंटेनर चालकांना आरोपींनी आपसात संगनमत करून एसटीडी एफई ऑईल हा ज्वलनशील पदार्थ असतानाही ते डिझेल असल्याचे सांगून त्याची विक्री करून फसवणूक केली जात होती. याबाबतची माहिती गुन्हे शाखा कक्ष-2 पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर बोरे यांनी मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शरद ढोले, प्रवीण फडतरे, उपनिरीक्षक वैभव रोंगे, हवालदार सुनिल साळुंखे, सचिन पवार, नाईक सुनिल कुदळे, चेतन जेजुरकर, इंद्रजीत कानू, सचिन म्हात्रे, शिपाई अजिनाथ फुंदे, प्रवीण भोपी आदींच्या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून आरोपी अविनाश रूपनारायण सिंग (40), प्रदिपकुमार पृथ्वीसिंग (35), मुकेश शर्मा (32) व धनेश अरोरा (50) यांना ताब्यात घेतले.
तसेच आरोपींकडून 67, 380 रूपये किंमतींचा ऐवज हस्तगत केला आहे. या गुन्ह्याची नोंद तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास गुन्हेशाखा कक्ष-2चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण फडतरे करीत आहेत.