ठोस आश्वासनाशिवाय माघार न घेण्याचा निर्धार; आंदोलनकर्त्या महिला रंगल्या भजनात
नागोठणे ः प्रतिनिधी – येथील रिलायन्स कंपनीच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त, ठेकेदारीतील कामगार तसेच सुशिक्षित बेरोजगारांनी शुक्रवारपासून सुरू केलेल्या आंदोलनाबाबत अद्याप निर्णय न झाल्याने तिसर्या दिवशीही अखंडपणे आंदोलन सुरू ठेवण्यात आले. प्रकल्पग्रस्तांनी कंपनीसमोरील मोकळ्या जागेत आंदोलन सुरू ठेवले असून आपल्या मागण्यांसाठी थंडी व उन्हाची तमा न बाळगता त्याच ठिकाणी वास्तव्यास आहेत.
आंदोलनात 300 ते 350 महिलांचाही समावेश आहे. येथे शनिवारी स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला, मात्र सरकारी तसेच रिलायन्सचा एकही वरिष्ठ अधिकारी तिसर्या दिवसापर्यंत येथे फिरकला नसल्याचे स्पष्ट होत आहे. आंदोलनकर्त्या महिला दिवसा तसेच रात्री भजन गात असल्याने परिसर संगीतमय झाला आहे. येथील वीजपुरवठा रात्री बंद करण्यात येतो.
याबाबत बोलताना संघटनेचे स्थानिक सरचिटणीस गंगाराम मिणमिणे म्हणाले की, या ठिकाणी वीजपुरवठा वाढवावा, अशी मागणी रिलायन्सकडे वारंवार करूनही त्यांनी दुर्लक्षच केले. परिसरात असलेले विद्युत दिवेही रात्री अकरा ते साडेअकरादरम्यान कंपनीकडून बंद केले जातात. या ठिकाणी महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. परिसरात असलेले स्वच्छतागृहही कंपनीने बंद केल्याने महिलांची कुचंबना होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रकल्पग्रस्तांना मानसिक त्रास दिल्सास ते आंदोलन बंद करतील असे कंपनी व्यवस्थापनाला वाटत असेल, मात्र आम्ही आजही आमच्या मागण्यांवर ठाम असून ठोस निर्णय झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.