रोहे : प्रतिनिधी
शाळा व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कपात करण्यास स्पष्ट नकार दिल्याने रोहे येथील जे. एम. राठी इंग्लिश स्कूलच्या फीबाबत निर्माण झालेला तिढा कायम आहे. कोरोनामुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या, काहींचे व्यवसाय ठप्प झाले. त्यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अशातच ऑनलाइन शिक्षणासाठी पालकांना मोठा खर्च सोसावा लागत आहे. यामुळे पालकांना फी भरण्याबाबत पूर्णपणे अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जे. एम. राठी इंग्लिश स्कूलने विद्यार्थ्यार्ंची निम्मी फी घ्यावी, अशी मागणी पालक वर्गातून होत होती. त्यासाठी सर्व पालकांनी एकत्र येत समन्वय समितीची स्थापना केली. या समितीच्या वतीने राठी इंग्लिश स्कूलच्या व्यवस्थापनाला विद्यार्थ्यांची फी निम्मी घ्यावी यासाठी निवेदन देण्यात आले होते. त्यावर चर्चा करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने सोमवारी बैठक बोलावली होती. या बैठकीला स्कूल व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधी रचना राठी, भिकाजी कदम, मुख्याध्यापिका लीना डेविड, उपमुख्याध्यापक दीपक माने, पालक समन्वय समितीचे सचिन मोरे, सचिन चाळके, राजेंद्र जाधव, वैभव भट, अमित उकडे, नीलेश शिर्के, मिलन शहा, महादेव सरसंबे, साहिल येरुणकर, राम नाकती, मोहिनी राजपुरकर, भाग्यश्री पाटणवाला, सुनैना पवार, ज्योती कदम उपस्थित होते. या बैठकीत पालक समन्वय समितीचे राजेंद्र जाधव, वैभव भट, निलेश शिर्के, मिलिंद शहा, अमित उकडे, महादेव सरसंबे आदींनी विद्यार्थ्यांची फी निम्मी घ्यावी, अशी मागणी केली होती. मात्र व्यवस्थापन समितीच्या प्रतिनिधी रचना राठी यांनी विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कपात करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे पालक आक्रमक झाले असून विद्यार्थ्यांची फी निम्मी घ्यावी यावर ते ठाम आहेत.