शरद पवारांना भाजपचे प्रत्युत्तर
मुंबई : प्रतिनिधी
शेतकरी आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारला इशारा दिला आहे. यावर आता भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. मोदी सरकारने सर्वसामान्य शेतकर्यांना डोळ्यासमोर ठेवून कृषी कायद्यात सुधारणा केल्या आहेत. या कायद्याचा फायदा सर्व शेतकर्यांना होणार आहे. त्यामुळे काहीही झाले तरी कायदा रद्द होणार नाही. या कायद्यात फक्त बदल केला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे
केंद्र सरकारने कृषी कायद्यात नव्याने कोणताही मोठा बदल केलेला नाही. जे जुन्या कायद्यात होते तेच कायम असून, फक्त आता या कायद्याने शेतकर्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, सुधारित कृषी कायद्यांवरून दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांचे आंदोलन सुरूच आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये 9 डिसेंबर रोजी पुन्हा एकदा चर्चा होणार आहे, मात्र त्याआधीच 8 डिसेंबर रोजी शेतकरी संघटनांनी ’भारत बंद’ची हाक दिली आहे. यामागे विरोधकांचा हात असून, विरोधी पक्ष या मुद्द्यावरून राजकारण करीत असल्याची चर्चा आहे.