Breaking News

आंबेघर-आमडोशी रस्ता दुरुस्तीला मुहूर्त

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

नागोठणे ः प्रतिनिधी

रोहे-नागोठणे मार्गात आंबेघर फाटा ते आमडोशी फाट्यापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाल्याने खड्डेमय रस्त्यावरून वाहन चालवताना चालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्या पार्श्वभूमीवर स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांनी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी संबंधित विभागाकडे पाठपुरवठा केला होता. परिणामी अलिबागच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आता जाग आल्यावर या तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाला प्रारंभ करण्यात आला.

या कार्यक्रमाला रोहे पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती देवरे, भाजपचे रोहे तालुका चिटणीस सुभाष पाटील, वरवठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच राजश्री दाभाडे, उपसरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, ग्रा. पं. सदस्य शैला नाईक, रोहे तालुका सरचिटणीस आनंद लाड, भाजपचे युवा नेते सिराज पानसरे, नागोठणे शहर अध्यक्ष सचिन मोदी, संतोष लाड, काशिनाथ दाभाडे, गोकुळ पाटील, कृष्णा म्हात्रे, सुभाष म्हात्रे, गणेश पाटील, किरण म्हात्रे, निलेश भोय आदी उपस्थित होते.

खड्डेमय रस्त्यामुळे एसटी महामंडळाच्या सर्व एसटी बसेससाठी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. या मार्गावरून गाड्या जात नसल्याने वरवठणे तसेच परिसरातील इतर गावांतील नागरिकांना रोहे येथे जाण्यासाठी नागोठणे स्थानकात यावे लागत होते. याबाबत ठेकेदार असणार्‍या रामेश्वर कन्स्ट्रक्शनचे शंकर तांबोळी यांना रस्ता दुरुस्तीबाबत विचारले असता तीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सर्व खड्ड्यांचे डांबरीकरण करण्यात येणार असून 15-20 दिवसांत हे काम पूर्ण होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मनसेचे तालुका चिटणीस प्रल्हाद पारंगे यांनी रोहे तालुका मनसेच्या वतीने बुधवारी 9 डिसेंबर रोजी हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात येईल, असा संबंधित विभागाला इशारा दिला होता, मात्र दोन दिवस अगोदरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने याबाबत पारंगे यांना विचारले असता काम सुरू झाल्याने 9 तारखेचे आंदोलन करायचे की नाही याचा लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Check Also

मोहोपाड्यात रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण संवाद मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष उरण विधानसभेच्या वतीने रविवारी (दि. 14) सकाळी 10.30 …

Leave a Reply