Breaking News

नवी मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींना मिळणार चार एफएसआय

आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नांना यश

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबईतील सिडकोनिर्मित, खासगी तसेच एपीएमसी बाजार आवारातील मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतींचा चार एफएसआय देऊन पुनर्विकास करावा, अशी मागणी बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी सातत्याने शासन दरबारी केली होती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत सकारात्मक निर्णय देत मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी चार एफएसआय देण्याबाबतचे आदेश संबंधित उच्चाधिकार्‍यांना दिले आहेत.

या वेळी नगरविकास आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे, मुख्य सचिव, अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव भूषण गगराणी, सिडको व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत समिती स्थापन करण्यात आली असून पुढील नियोजनाबाबतचा अहवाल लवकरच सादर करण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील खासगी, सिडकोनिर्मित तसेच एपीएमसी आवारातील अनेक इमारती मोडकळीस आल्या असून काही इमारती महापालिकेने धोकादायक जाहीर केल्या आहेत. नवी मुंबईमधील अनेक इमारतींचे छत कोसळण्याच्या घटना आजही घडत आहेत. वेळीच मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास झाला नाही, तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची तसेच हजारो नागरिक बेघर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इमारतींच्या पुनर्विकासाकरिता शासनाने मंजूर केलेला अडीच एफएसआय पुरेसा नसल्याने पुनर्विकासासाठी चार चटई क्षेत्र दिल्यास रहिवाशांच्या हिताचे होणार आहे.

इमारतींचा पुनर्विकास करताना चांगल्या प्रतीचे उत्तम बांधकाम करणार्‍या विकासकाची आवश्यकता आहे. शापूरजी पालनजी, एल अ‍ॅण्ड टी, टाटा तसेच बी. जी. शिर्के यांसारख्या नावाजलेल्या विकासकांची नेमणूक करून इमारतींचा पुनर्विकास केल्यास रहिवाशांना दर्जेदार व मोठी घरे मिळू शकतील. त्यामुळे रहिवाशांची फसवणूकही होणार नाही.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply