Breaking News

नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीयत्वाच्या विचारांनी ओतप्रोत संसद भवनाच्या निर्मितीचा शुभांरभ हा आपल्या लोकशाही परंपरेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. नवे संसद भवन आत्मनिर्भर भारताचे प्रतिक असेल. नव्या भारताच्या उभारणीचे ते साक्षीदार ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (दि. 10) येथे केले. सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पातंर्गत संसद भवनाचे भूमिपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते.
या सोहळ्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, उद्योगपती रतन टाटा आदी मान्यवरांसह सर्व धर्मांच्या गुरूंचीदेखील उपस्थिती होती. पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवीन संसद भवनाच्या उभारणीसाठी पूजा करण्यात आली. भूमिपूजनानंतर त्यांनी कोनशिलेचे अनावरण केले. भारतात लोकशाही ही फक्त व्यवस्था नाही, तर ती जीवनपद्धती आहे. लोकशाही हा या देशाचा आत्मा आहे. नवीन संसद भवनाची निर्मिती नव्या व जुन्याच्या सहअस्तित्वाचे उदाहरण आहे. आपण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आपल्या सध्याच्या संसद भवनाने स्वातंत्र्याचे आंदोलन व नंतर स्वतंत्र भारताला घडण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या सरकारची निर्मिती इथेच झाली व पहिली संसददेखील इथंच बसली. याच संसद भवनात आपल्या राज्यघटनेची रचना झाली, लोकशाहीची पुनर्स्थापना झाली. संसदेची सध्याची इमारत स्वतंत्र भारताचे प्रत्येक चढ-उतार, आव्हाने, आपल्या आशा-आकांक्षा, समाधान व यशाचे प्रतीक राहिलेली आहे. या इमारतीत बनलेला प्रत्येक कायदा, या कायद्याच्या निर्मितीदरम्यान झालेल्या अनेक गंभीर चर्चा हे सर्व आपल्या लोकशाहीचा ठेवा आहे, मात्र संसदेच्या शक्तीशाली इतिहासाबरोबरच यथार्थ स्वीकारणे तेवढेच आवश्यक आहे. ही इमारत आता जवळजवळ 100 वर्षांची होत आहे. मागील दशकात तत्कालीन गरजांना लक्षात घेता सातत्याने यामध्ये बदल केले गेले. या प्रक्रियेत सदस्यांना बसण्यास पुरेसी जागा मिळावी यासाठी भिंतीदेखील हटवल्या गेल्या आहेत. एवढे सर्व झाल्यानंतर हे संसद भवन आता विश्रांती मागत आहे.
पंतप्रधानांनी या वेळी आपल्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, आयुष्यातील तो क्षण कधीच विसरू शकत नाही जेव्हा 2014मध्ये मी पहिल्यांदा खासदार म्हणून संसद भवनात आलो. या लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश करण्याआधी मी आपला माथा झुकवून, तो पायर्‍यांवर टेकवून या मंदिराला नमन केले होते. नव्या संसद भवनामध्ये अशा अनेक गोष्टी होणार आहेत ज्यामुळे खासदारांची कार्यक्षमता वाढेल, त्यांच्या कामामध्ये आधुनिकता येईल.
नवीन संसद भवनाची इमारत चार मजली असणार आहे. यासाठी 971 कोटींच्या निधी मंजूर करण्यात आला असून, टाटा प्रोजेक्ट लिमिटेडकडे भवनाच्या उभारणीच  कंत्राट देण्यात आले आहे.

Check Also

खासदार श्रीरंग बारणे यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करा

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्त पिंपरी-चिंचवडकर खासदार श्रीरंग बारणे …

Leave a Reply