धाटाव : प्रतिनिधी
’उपजीविका विकास’ उपक्रमाअंतर्गत येथील सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीजकडून रोहा तालुक्यातील धाटाव आदिवासीमधील 11 कुटुंबांना 80 शेळ्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला लाभार्थ्यांचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शेळीपालन व्यवस्थापन, शेळ्यांच्या विविध जाती, त्यांचा आहार, आजार आणि उपचारपद्धती याची माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रत्येकी दोन शेळ्या, चार कोकरू व एक बोकड अशा संचात 11 आदिवासी कुटुंबांना वाटप करण्यात आले. तसेच शेळ्यांच्या निवार्यासाठी सुदर्शनकडून शेडही बांधून देण्यात आली. या शेळ्यांचा विमाही उतरविण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविण्यासाठी पुण्यातील कर्वे सामाजिक सेवा संस्थेचे सहकार्य घेण्यात आले.
धाटाव आदिवासीवाडीतील कुटुंबांच्या विकासासाठी सुदर्शन इंडस्ट्रीज यापुढेही प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही कंपनीच्या सीएसआर विभागाच्या वरिष्ठ व्यवस्थापिका माधुरी सणस यांनी या वेळी दिली.
धाटावचे उपसरपंच यशवंत रटाटे, रुपेश मारबते, राजू घारगे, ग्रामपंचायत सदस्य उत्तरा म्हसकर, मंदा वाघमारे, धाटाव आदिवासीवाडी ग्रामअध्यक्ष मारुती वाघमारे यांच्यासह आदिवासीवाडीतील ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.