आमदार रविशेठ पाटील यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
रोहे, धाटाव ः प्रतिनिधी
रोह्यात भाजपची ताकद उभारायची आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आम्ही सुतारवाडी भागात आघाडी घेतली. आगामी ग्रामपंचायत, नगर परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी सज्ज व्हावे. तुम्ही चिंता करू नका. भाजप तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. आपल्याला गोरगरिबांचा उमेदवार उभा करायचा आहे. मागील 25 वर्षे या भागाचे नेतृत्व एकाच कुटुंबाकडे आहे. त्यामुळे या भागात सर्वसामान्य नेताच तयार झाला नाही. एकाच कुटुंबाकडे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य असे नेतृत्व आले. त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे एका घराण्याचे राजकारण संपवायचे आहे, असे आवाहन आमदार रविशेठ पाटील यांनी तानाजी देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, ज्येष्ठ नेते संजय कोनकर, तालुका अध्यक्ष सोपान जांभेकर, युवक जिल्हाध्यक्ष अमित घाग, शहराध्यक्ष वसंत शेलार, तानाजीआप्पा देशमुख, हेमंत देशमुख, मारुती देवरे, हेमंत देशमुख, नवनीत डोलकर, उत्तम नाईक, अमरदीप म्हात्रे, संजय लोटणकर, अरुण वाघमारे, शैलेश रावकर, सागर ओक, धर्मा ठाकूर, श्रद्धा घाग, सौ. फाटक आदी भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
भाजपच्या वतीने आगामी ग्रामपंचायत, नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांची आढावा बैठक रोह्यातील शासकीय विश्रामगृह येथे जिल्हाध्यक्ष महेश मोहिते यांनी घेतली. त्यानंतर आमदारांच्या उपस्थितीत तानाजीआप्पा देशमुख यांच्या निवासस्थानी प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत भाजप बुथ स्तरावर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी मोर्चेबांधणी करीत आहे. आगामी ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकीसाठी व्यहूरचना करीत आहे. त्या दृष्टीने कार्यकर्त्यांची मते या वेळी जाणून घेण्यात आली.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी पेणच्या मोर्चानंतर आता प्रत्येक जण जबाबदारीने वागत आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित ताकदीने कामाला लागले पाहिजे.
रोह्यातील घराणेशाहीला लोक कंटाळले आहेत. त्यामुळे भाजपचे नेतृत्व प्रत्येकाला हवेहवेसे वाटत आहे. भाजप हा एकमेव पक्ष लोकाभिमुख काम करीत आहे. आपण सर्वांनी ताकदीने काम केल्यास आपल्या पाठीशी भाजपचे सर्व आमदार ताकदीने उभे राहतील, असे आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
महेश मोहिते यांनी रोहा तालुक्यात परिवर्तन अटळ आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. एकत्र येऊन काम केल्यास भाजपच नंबर एकचा पक्ष बनेल, असे सांगितले. या वेळी तानाजीआप्पा देशमुख यांनी आपण सर्वांनी ताकद दिल्यास येत्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही ताकदीने निवडणूक लढवू असे सांगितले. प्रास्ताविकात मारुती देवरे यांनी भाजपमुळे रायगडात चैतन्य निर्माण झाले. त्याचा लाभ येत्या ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकीत भाजपला होणार असल्याचे सांगितले.
महाविकास आघाडी सरकार संधिसाधू : आमदार प्रशांत ठाकूर
रायगडात यापुढे दडपशाही चालू देणार नाही. हे आम्ही पेणच्या मोर्चातून दाखवून दिले. आतापर्यंत राजकारणात विधानसभा निवडणूक व नंतर मोठा फरक पडला. राष्ट्रवादी विरुद्ध शेकाप असे लढले. त्यानंतर सत्तेसाठी शेकाप व राष्ट्रवादी एकत्र आले. जिल्ह्यात कधी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असे सातत्याने एकमेकांच्या विरोधात लढले असताना सत्तेसाठी हे एकत्र आले आहेत. महाविकास आघाडीमधील काँग्रेस वीज बिलात सूट देणार असे सांगत असताना आज संपूर्ण वीज बिल भरावे लागणार असे आता काँग्रेस बोलतेय. भाजपची पाच वर्षांत विकासाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. याउलट महाविकास आघाडी सरकार संधिसाधू आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे मंत्री संधी साधून मलाई खाण्यात व्यस्त आहेत. रायगडचे पालकमंत्री सांगतात की, आम्ही सर्वाधिक नुकसानभरपाई श्रीवर्धनमध्ये दिली. मग रोहा, माणगाव, तळावासीयांनी काय केले? असा सवाल आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी विचारला. शिवसेना, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी आतापर्यंत सर्वसामान्य जनतेला फसवले. भाजप मात्र सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करीत असून आपण सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जुने-नवे वाद विसरून एकत्रित पुढे आले पाहिजे, असे आवाहनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.