Breaking News

नवी मुंबईत कोरोना मृत्यूचे सत्र कायम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटली असून कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे, मात्र शहरात कोरोना मृत्यूचे सत्र कायम आहे. दररोज दोन ते चार जणांचा मृत्यू होत असल्याने मृत्यूंचा आकडा एक हजार 33 झाला आहे. यात ऐरोलीत सर्वाधिक 163 मृत्यू आहेत.

दिवाळीपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना प्रादुर्भाव दिवाळीनंतर पुन्हा वाढला होता. मात्र परत ही परिस्थिती नियंत्रणात येत आहे. यामुळे शहरातील 13 कोरोना काळजी केंद्रांपैकी 11 केंद्रे सद्य:स्थितीत बंद करण्यात आली असून वाशी महापालिका रुग्णालयही सामान्य रुग्णालय करण्यात आले आहे. आता शहरात दोनच ठिकाणी कोरोनावर उपचार करण्यात येत आहेत. ही परिस्थिती नवी मुंबईसाठी दिलासादायक असली तरी कोरोनामुळे मृत्यूंचे सत्र थांबलेले नाही. सुरुवातीचे काही दिवस वगळता एकही दिवस कोरोना मृत्यू झाला नाही असे नाही.

शहरात करोनाचा पहिला रुग्ण 13 मार्च रोजी सापडला तर पहिला मृत्यू 23 मार्च रोजी झाला. जुलै महिन्यात शहरातील मृत्युदर हा 3.26 होता. त्यात घट होत नोव्हेंबरमध्ये तो 2.03 टक्क्यापर्यंत खाली आला होता. त्यानंतर बाधितांच्या संख्येत काहीशी वाढ होत मृत्युदरात किंचितशी वाढ झाली आहे. 18 डिसेंबपर्यंत शहरात कोरोना मृत्युदर 2.05 टक्के इतका आहे. यात मोठी वाढ दिसत नाही, मात्र कोरोना मृत्यू थांबविण्यात अद्याप प्रशासनाला यश आलेले नाही.

मृत्युदर शून्यावर आणण्यासाठी महापालिकेने त्रिस्तरीय उपचारपध्दतीचा अवलंब केला. त्याला काही प्रमाणात यशही मिळाले. त्यामुळे मृत्यूंचा आकडा दिवसाला 2 ते 3 वर येऊन ठेपला आहे. पूर्वी हाच आकडा प्रतिदिनी 5 ते 6 इतका होता. मृत्युदर कमी करण्याबरोबरच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने केलेल्या उपाययोजना प्रभावी ठरल्या. त्यामुळे रुग्णांच्या दैनंदिन आकड्यात घट झाली.

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे. असे असले तरी पुढील काळात अधिक सतर्क राहण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

ऐरोलीत सर्वाधिक मृत्यू

दररोज कोरोनामुळे दोन ते चार रुग्ण दगावतात. त्यामुळे शहरातील कोरोना मृत्यूंची संख्या ही एक हजारपेक्षा अधिक झाली आहे. यात ऐरोली विभागात सर्वाधिक म्हणजे 163 कोरोना मृत्यू झाले असून दिघा विभागात सर्वात कमी 44 कोरोना मृत्यू आहेत.

बाधितांनी ओलांडला 50 हजारांचा टप्पा

कोरोना रुग्णांनी 50 हजारांचा टप्पा पार केला आहे. मार्चनंतर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. दिवसेंदिवस त्याचा कहर वाढत गेल्याने रुग्णांची एकूण संख्या 50,291 इतकी झाली आहे. तर 1033 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने बळी घेतला आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply