पनवेल : वार्ताहर
रायझिंग डे सप्ताहानिमित्ताने पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध विभागात जनजागृती मोहिम उपक्रम राबविला जात असून त्याद्वारे नागरिकांना अधिकारी मार्गदर्शन करीत आहेत. यामध्ये प्रामुख्याने कोविड 19, सायबर क्राईम, घरफोडी चोरी, या विषयावर जनमानसात जनजागृती व्हावी याकरिता चौक बैठका घेतल्या जात आहेत. यामध्ये किमान दोन ते अडीच हजार लोकांपर्यंत संदेश पोहचेल या उद्देशाने पोलीस स्टेशनचे संपूर्ण पोलीस अधिकारी व अंमलदार हे आपल्या बीटमध्ये दिवसभरात बैठका घेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोरोना संसर्ग टाळण्याकरिता हात नियमित साबणाने धुवा, मास्क वापरा, सामाजिक अंतर राखा, गर्दीच्या ठिकाणे जाणे टाळा, सायबर गुन्ह्यापासून वाचण्याकरिता मोबाइलला कॉलवर कोणतीही बँक डिटेल, क्रेडिट अथवा डेबिट पिनकोड, ओटीपी कुणालाही सांगू नका, माहिती नसलेली अथवा संशयित फसव्या लिंक ओपन करू नका, अनोळखी व्यक्ती सोबत पैशांचा व्यवहार करताना क्यू आर कोडचा वापर करू नका, केवायसी अपडेट करणेकरिता कॉल करून आपल्या अकाऊंट, डेबिट, क्रेडिट कार्डची माहिती कुणालाही देऊ नका, सोशल मीडियावर पर्सनल फोटो अपलोड करू नका. चोरीच्या घटनांसदर्भात त्यांनी चोरीच्या घटना टाळण्यासाठी प्रत्येक दुकानदाराने त्यांचे दुकानाचे शटर्सला सेंटर लॉक बसवावे, दुकानात अनावश्यक अथवा मोठ्या रक्कमेची कॅश ठेऊ नये, सीसीटीव्ही चांगल्या प्रतीचे लावा व दुकानव्यतिरिक्त रस्त्यावरील घटनाक्रम सुद्धा चित्रित होईल अशा जागी सीसीटीव्ही लावा, चारचाकी वाहनांना अटोकोप, जीपीएस सारख्या सुरक्षा यंत्रणाचा वापर करा, मोटरसायकल सुरक्षित ठिकाणी व हँडल लॉक करुन पार्क कराव्यात, बाहेरगावी जाताना घरातील कमी प्रकाशाचा दिवा अशाप्रकारे लावा जेणेकरुन घरात माणसाचा वावर आहे असे भासेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन पोलिसांमार्फत नागरिकांना केले जात आहे. या उपक्रमाचे पनवेलकरांनी कौतुक केले आहे.