Breaking News

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने मागितली ‘टीम इंडिया’ची माफी

वर्णभेदी टिप्पणीची घेणार दखल

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना स्लेजिंग होणार नाही असे फार क्वचितच घडते. सुरुवातीच्या काळात ऑस्ट्रेलियन खेळाडू भारतीय खेळाडूंना त्रास द्यायचे, पण नंतर भारतीय संघानेही आक्रमक पवित्रा स्वीकारत जशास तसे उत्तर द्यायला सुरुवात केली. त्यामुळे गेली काही वर्षे या दोन संघांमध्ये मैदानावर बाचाबाची होणे अगदी स्वाभाविक झाले आहे, पण सिडनी कसोटीत तिसर्‍या आणि चौथ्या दिवशीच्या खेळात असा काही प्रकार घडला की थेट ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाला भारतीय खेळाडूंची माफी मागावी लागली.
 सामन्याच्या तिसर्‍या दिवशी सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. मैदानावर घडलेल्या या प्रकाराबाबत भारतीय क्रिकेट संघाने पंचांकडे औपचारिक तक्रार नोंदवली. त्यानंतर चौथ्या दिवशीही चालू क्रिकेट सामन्यात काही चाहत्यांनी त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केली. सिराज सीमारेषेवर फिल्डिंग करत असताना हा प्रकार घडला. त्याने सुरुवातीला दुर्लक्ष केले, पण त्यांच्याकडून वर्णद्वेषी टीका थांबत नाही हे पाहिल्यानंतर त्याने थेट कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांच्या कानावर ही बाब घातली. त्यानंतर बराच काळ खेळ थांबवण्यात आला होता.
भारतीय खेळाडूंच्या तक्रारीनंतर मैदानात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी तेथील चाहत्यांची चौकशी केली आणि अखेरीस तेथील काही चाहत्यांना तेथून उठवण्यात आले. घडलेल्या प्रकारात अजिंक्य रहाणे आणि संपूर्ण भारतीय संघ सिराजच्या पाठीशी उभा राहिल्याचे दिसल्याने सार्‍यांनी टीम इंडियाचे कौतुक केले.
या प्रकारानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अधिकृत पत्राद्वारे भारतीय संघाची माफी मागत अशा चाहत्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. भारतीय खेळाडूंबद्दल चाहत्यांनी केलेल्या वर्णभेदी टिप्पणीचा क्रिकेट ऑस्ट्रेलिया निषेध करते. कोणाच्याही वर्णावरून किंवा इतर गोष्टींवरून हिणवण्याच्या वृत्तीच्या आम्ही पूर्णपणे विरोधात आहोत. शनिवारी घडलेल्या प्रकाराबाबत आमचे संबंधित अधिकारी तपास करीत आहेत. त्यांच्याकडून अहवाल आला की दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. क्रिकेट मालिकेचे यजमान म्हणून आम्ही भारतीय संघातील खेळाडूंची बिनशर्त माफी मागतो. घडलेल्या प्रकाराचा सखोल तपास केला जाईल याची आम्ही खात्री देतो, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply