अलिबाग : प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोना प्रतिबंधक कोविशिल्ड लस बुधवारी (दि. 13) रात्री रायगड जिल्ह्यात दाखल झाली. लसीच्या नऊ हजार 700 कुप्या जिल्ह्यात आल्या आहेत. लसीकरणासाठी तयारी पूर्ण झाली असून, सर्व यंत्रणा सज्ज आहे. 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेतील कर्मचार्यांना लस दिली जाणार आहे. जिल्हा रुग्णालय अलिबाग, उपजिल्हा रुग्णालय पेण व कर्जत येथे ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व आरोग्य कर्मचार्यांचे लसीकरण होणार आहे. एमजीएम कामोठे, वायएमटी रुग्णालय पनवेल येथे नगरपालिकेच्या सर्व आरोग्य कर्मचारी यांचे लसीकरण होईल. 16 जानेवारी रोजी 100 लाभार्थी याचा लाभ घेतील. नंतर पुन्हा 28 दिवसानंतर त्यांना दुसरा डोस देण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे हजारो नागरिकांचा जीव गेला आहे. कोविशिल्ड लस आता उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात साडेआठ हजार लाभार्थ्यांना लस टोचली जाणार आहे.