जिल्हा शल्यचिकित्सकांनी घेतला पहिला डोस
अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील चार केंद्रांवर शनिवारी (दि. 16) कोविशिल्ड लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. या लसीकरण मोहिमेची सुरुवात आरोग्य कर्मचार्यांपासून करण्यात येत आहे. अलिबाग येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना लस टोचून मोहिमेस सुरुवात करण्यात आली.
अलिबाग येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात कोविशिल्ड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी पालकमंत्री आदिती तटकरे, जि. प. अध्यक्ष योगिता पारधी, आमदार महेंद्र दळवी, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्यासह आरसीएफचे अधिकारी, जिल्हा रुग्णालयातील इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात अलिबाग, पेण येथे प्रत्येकी एक आणि पनवेल येथील दोन अशा चार केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य कर्मचार्यांना कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. जिल्ह्यातील कोविशिल्ड लसीकरण मोहिमेसाठी नऊ हजार 500 लशी प्राप्त झाल्या आहेत. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी त्याच व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येणार आहे. त्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली कोविशिल्ड तसेच भारत बायोटेक या उत्पादकाने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस देण्यात येणार आहे. या दोन्ही लशी सुरक्षित असल्याचे केंद्र शासनाने कळविले आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्रथम प्राधान्याने आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानुसार नोंदणी झालेल्या सर्व शासकीय व खासगी डॉक्टर्स, नर्सेस व इतर आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात येणार आहे. प्रत्येक लसीकरण केंद्राच्या ठिकाणी शीतसाखळी आबाधित ठेवून लस तसेच लसीकरणासाठी आवश्यक सामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व संबंधित कर्मचार्यांना आवश्यक प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
पेणमध्येही लसीकरणाला सुरुवात
पेण : प्रतिनिधी
केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पेण येथे कोविड लसीकरण मोहिमेचा शुभारंभ शनिवारी (दि. 16) आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपविभागीय अधिकारी विठ्ठल इनामदार, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, तहसीलदार डॉ. अरुणा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
पेण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजीव तांभाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून लसीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी उपस्थितांना कोविशिल्ड लसीकरण मोहिमेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यात आली. उपजिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी या वेळी उपस्थित होते.