Breaking News

तुला परत मानला रे ठाकूर!; विराटकडून मराठमोळ्या अंदाजात शार्दुलची प्रशंसा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताची फलंदाजी सुरुवातीला काहीशी डगमगली. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरत शतकी भागीदारी केली. यावर भारताचा कर्णधार विराट कोहलीने कौतुक केले आहे. भारताकडून पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 67 धावांची खेळी केली. कसोटी कारकिर्दीतील त्याचे हे पहिले अर्धशतक ठरले. 115 चेंडूंत त्याने नऊ चौकार आणि दोन षटकार लगावत अर्धशतक साजरे केले. वॉशिंग्टन सुंदरनेदेखील 144 चेंडूंत 62 धावा केल्या. याबद्दल भारताचा कर्णधार विराटने शार्दुल आणि सुंदरच्या खेळीची स्तुती केली. विशेष म्हणजे त्याने शार्दुलचे मराठीत कौतुक केले. ‘वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर, तुम्ही दोघांनी अतिशय मोक्याच्या वेळी तुमची उपयुक्तता सिद्ध केलीत. स्वत:च्या खेळीवर विश्वास ठेवत तुम्ही सामना भारतासाठी पुन्हा जिवंत केलात. हीच कसोटी क्रिकेटची खरी मजा आहे. वॉशिंग्टन तू पदार्पणाच्या सामन्यात दमदार कमाल केलीस आणि तुला परत मानला रे ठाकूर!,’ अशा शब्दांत विराटने दोघांचे कौतुक केले.

गाबा दा ढाबा! सेहवागकडून हटके कौतुक

भारताचा धडाकेबाज माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या हटके अंदाजात शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांचे कौतुक केले. ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात सुरू असलेल्या सामन्याबाबत त्याने ट्विट केले ‘गाबा दा ढाबा’. शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्यासाठी आजची फलंदाजी म्हणजे ढाब्यावर जाऊन छान जेवणावर ताव मारण्यासारखे होते. दोघांनी अप्रतिम खेळ करून दाखवला. या दोघांच्या प्रयत्नांमुळेच ऑस्ट्रेलियाला केवळ 33 धावांची आघाडी घेता आली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा एकत्रित मिळून हजारांहून जास्त सामन्यांचा अनुभव आहे. त्यांच्याविरुद्ध असा खेळ करणे मोठी गोष्ट आहे, असे सेहवागने म्हटले.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply