अलिबाग ः प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या आरोपीला अलिबाग विशेष सत्र न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली असून 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही घटना अलिबाग तालुक्यात 13 ऑगस्ट 2015 रोजी घडली होती.
आरोपी राकेश संजय शिंदे याची 15 वर्षीय पीडित मुलीशी ओळख होती. ती अल्पवयीन असल्याचे त्याला माहीत होते, मात्र तरीही त्याने तिला लग्नाचे प्रलोभन दाखवून पालकांच्या कायदेशीर ताब्यातून पळवून नेले. नंतर शिर्डी, रांजणगाव, पुणे येथे नेऊन तिच्याशी जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्तापित केले. या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांनी तपास करून अलिबाग येथील विशेष सत्र न्यायालयात आरोपी राकेश संजय शिंदे याच्याविरोधात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी विशेष अतिरिक्त सत्र न्यायाधीश-1 शईदा शेख यांच्या न्यायालयात झाली. या वेळी शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता राजाराम धुमाळ यांनी काम पाहिले. सुनावणीदरम्यान एकूण 13 जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. यात पीडित मुलगी, वैद्यकीय अधिकारी रमेश कराड, तपासिक अंमलदार यशवंत सोळसे, शिर्डी, रांजणगाव आणि पुणे येथील लॉजचे मालक आणि फिर्यादी यांची साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने शासकीय अभियोक्ता स्मिता धुमाळ यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला.
आरोपी राकेश शिंदे याला भा. दं. वि कलम 363, 366 अ, 376 तसेच पॉक्सो कायद्यातील कलम 3 आणि 4 मधील तरतुदींतर्गत दोषी ठरविले आणि 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. याशिवाय 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावला, ज्यातील 30 हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेशही न्यायाधिशांनी दिले आहेत.