Breaking News

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा धडाकेबाज विजय

गिल, पंतची दमदार खेळी

ब्रिस्बेन : वृत्तसंस्था
अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात जबरदस्त विजय मिळवत मालिका 2-1 अशी जिंकली आणि बॉर्डर-गावस्कर चषक आपल्याकडे कायम राखला. शुभमन गिल आणि ऋषभ पंत भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
पाचव्या आणि अखेरच्या दिवशी भारताने 4 धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. टीम इंडियाला विजयासाठी 324 धावांची गरज होती. रोहित शर्मा आणि शुभमन गिल मैदानात होते. पॅट कमिन्सने रोहितला 7 धावांवर बाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर चेतेश्वर पुजार आणि गिल यांनी दुसर्‍या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. या दोघांनी 118 धावा केल्या. गिल कसोटीतील पहिले शतक झळकावेल असे वाटत असताना नॅथन लायनने त्याला 91 धावांवर बाद केले.
गिलच्या जागी आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेने भारतीय संघ विजयासाठी खेळणार असल्याचा मेसेज ऑस्ट्रेलियाला दिला. पुजारासोबत त्याने धावांचा वेग वाढवला, पण त्या प्रयत्नात रहाणे बाद झाला. त्याने 22 चेंडूत एक चौकार आणि एका षटकारासह 24 धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर मयांक अग्रवालच्या जागी ऋषभ पंत फलंदाजीसाठी आला. पंतने पुजारासोबत 61 धावांची भागिदारी केली.
ऑस्ट्रेलियाने नवा चेंडू घेतल्यानंतर कमिन्सने पुजाराला 56 धावांवर बाद केले. पुजाराने कसोटी करिअरमधील सर्वांत धीम्या गतीने केलेले हे अर्धशतक ठरले. त्याने 50 धावा करण्यासाठी 196 चेंडू घेतले. पुजाराच्या जागी आलेल्या अग्रवालने पंतसह पाचव्या विकेटसाठी 37 धावांची भागिदारी केली. कमिन्सने अग्रवालला 9 धावांवर बाद करीत भारताला पाचवा धक्का दिला. मयांकनंतर वॉशिंग्टन सुंदरने झटपट काढल्या, मात्र विजयाच्या समीप पोहचल्यानंतर सुंदर (22) आणि शार्दुल ठाकूर (2) यांनी विकेट फेकली, परंतु ऋषभ पंतने 89 धावांची नाबाद खेळी करीत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
पंतने मोडला धोनीचा विक्रम
ब्रिस्बेन कसोटी सामन्यातील दुसर्‍या डावात एक धाव घेताच भारताच्या ऋषभ पंतने कसोटीत एक हजार धावा पूर्ण केल्या. यासोबतच पंतने कसोटीत सर्वांत वेगवान एक हजार धावा करण्याचा भारतीय यष्टीरक्षकाचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता. कसोटी सामन्यात सर्वाधिक वेगवान एक हजार धावा करणार्‍या यष्टीरक्षकाचा विक्रम माजी कर्णधार धोनीच्या नावावर होता. धोनीने 32 डावांत कसोटीमध्ये ही कामगिरी केली होती.  धोनीने माजी यष्टीरक्षक फारुख इंजिनिअरचा विक्रम मोडीत काढला होता. फारुखने 36 डावांत एक हजार धावा केल्या होत्या, तर पंतने 27व्या डावांत एक हजार धावा ठोकल्या आहेत.
गिलने मोडला गावसकरांचा विक्रम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा शुबमन गिल याने दमदार अर्धशतकी खेळी केली. आपला तिसराच कसोटी सामना खेळणारा शुबमन गिल याने 146 चेंडूंत त्याने 91 धावांची खेळी केली. शतकाने त्याला हुलकावणी दिली, पण त्याने लिटल मास्टर सुनील गावसकरांचा 50 वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्या डावात अर्धशतक ठोकणारा गिल सर्वांत कमी वयाचा भारतीय ठरला. गिलने 21 वर्ष आणि 133 दिवसांचा असताना हा पराक्रम केला. गावसकरांनी 1970-71मध्ये वेस्ट इंडिविरूद्ध 21 वर्षे आणि 243 दिवसांचे असताना चौथ्या डावात अर्धशतक झळकावले होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply